खा. भावना गवळी यांच्या निकटवर्तीयास ईडीकडून अटक
मुंबई : शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान याला अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने अटक केली होती. त्याला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. कथित मनी लाँड्रिंग अर्थात पैशांच्या अफरातफरी प्रकरणात भावना गवळी यांचा निकटवर्तीय असलेल्या सईद खानला अटक करण्यात आल्याने खासदार गवळी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
महिला प्रतिष्ठान या ट्रस्टचं कंपनीमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी सईद खान यांना अटक करण्यात आली आहे. सईद खान हे संबंधित कंपनीचे संचालक आहेत. त्यामुळे आता भावना गवळींच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. ईडीने परभणी जिल्ह्यातील पाथरी याठिकाणी छापेमारी केली आहे. याप्रकरणी अधिकाऱ्यांनी सईद खान यांना अटक केली असून ते भावना गवळी यांच्या विविध ट्रस्ट आणि कंपन्यांचा कारभार पाहात होते. हरीश सारडा यांनी तक्रार केल्यानंतर ईडीने ही मोठी कारवाई केली आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे उकरून काढण्यात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा हातखंडा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका प्रकरणात भावना गवळी यांच्यावर आरोप केले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विदर्भातील रस्तेबांधणीच्या कार्यक्रमात शिवसेनेचे काही नेते अडथळे आणत असल्याचे म्हटले होते. यावरुन किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांनी १०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता.
या आरोपांना प्रत्युत्तर देताना भावना गवळी यांनी म्हटले होते की, किरीट सोमय्या यांनी माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. एकेकाळी ते आमचे सहकारी होते. मात्र, त्यांनी माझ्यासमोर येऊन कोणता भ्रष्टाचार झाला आहे, हे सांगावे. तेव्हा मी त्यांना उत्तर देईन, असे भावना गवळी यांनी म्हटले होते.
तसेच आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही भेटणार असल्याचे भावना गवळी यांनी सांगितले होते. वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. परंतु, काही लोक चुकीच्या पद्धतीने केंद्रीय मंत्र्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मी नितीन गडकरी यांना प्रत्यक्ष भेटून हे गैरसमज दूर करणार असल्याचे भावना गवळी यांनी म्हटले होते.