केंद्राची महाराष्ट्राला तुलनेत अधिक मदत; बोलघेवड्या नेत्यांनी कांगावा करु नये : फडणवीस
मुंबई: केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनचा पुरवठा करताना इतर राज्यांच्या तुलनेत दुप्पट मदत केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधील बोलघेवड्या नेत्यांनी रोज उठून कांगावा करु नये, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. सध्या लोक दु:खात आहेत. त्यामुळे त्यांना अशाप्रकारचे राजकारण पसंत पडणार नाही. केंद्र आणि राज्य सरकार आपापल्यापरीने महाराष्ट्राला मदत करत आहेत. त्यामुळे मदत मिळत नसल्याचा कांगावा बंद करावा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी अंधेरी येथे कोविड सेंटरचं उद्घाटन केलं. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी लसीकरणावर देखील भाष्य केलं. राज्य सरकारनं लसीकरणाची आपली दिशा ठरवली पाहिजे, असं फडणवीस म्हणाले. केंद्र सरकारने सोळा लाखांपैकी चार लाख ३५ हजार रेमडेसीविर इंजेक्शनचा कोटा महाराष्ट्राला दिला आहे. तसेच ११०० व्हेंटिलेटर्सही दिले आहेत. मात्र, या मदतीनंतर मुख्यमंत्री वगळता एकाही महाविकास आघाडीच्या नेत्याने केंद्र सरकारचे आभार मानले नाहीत, अशी खंत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
खरे तर केंद्राच्या मदतीची तुलना करु नये पण जे बोलघेवडे लोकं सातत्याने केंद्र सराकरवर टीका करतात त्यांना सांगू इच्छितो की इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला ऑक्सिजनचा दुप्पट कोटा दिला आहे. ११०० व्हेटिलेटर्स केंद्राने महाराष्ट्राला दिले आहेत. आजही भारतीय हवाई दलाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वैद्यकीय उपकरणे महाराष्ट्रात पोहोचले आहेत. जे कांगावेखोर आहेत, त्यांना सांगू इच्छितो की, केंद्र सरकार पूर्णपणे मदत करतंय. राज्य सरकार त्यांच्यापरिने काम करतंय. त्यामुळे दररोज सकाळी उठून कांगावा करणं बंद करावं, असं पडणवीस म्हणाले.
लसीकरणात मविआत एकवाक्यता नाही
फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर लसीकरणावरुन निशाणा साधला. प्रत्येक व्यक्तीला केंद्र सरकार मोफत लसीकरण करणार आहे. १०० टक्के भारतीयांना मोफत लस मिळावी यासाठी केंद्र सरकारने व्यवस्था उभी केली आहे. त्या व्यवस्थेतून लसीकरण केलं जाणार आहे. मात्र, राज्यातील मंत्र्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्या का येत आहेत? याची कल्पना नाही. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या डिलीट केलेल्या ट्विटवर बोलताना ट्विट्स करुन पुन्हा का डिलीट केले जातात, याबाद्दल कल्पना नाही आणि मी याविषयी बोलणार नाही, असं फडणवीस म्हणाले.
आता महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडून वेगवेगळी वक्तव्य का केली जात आहेत? आदित्य ठाकरे यांनी ट्विट डिलीट का केले, यावर मला बोलायचे नाही. १ तारखेपासून आपल्याला लसीकरणाची पद्धत बदलायला हवी. कारण आता मोठ्या संख्येने लोक यात सामील होणार आहेत. त्यामुळे थोडी अव्यवस्था होण्याची शक्यता आहे. गर्दी होण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने त्यासाठी धोरण आखायला हवे, असे फडणवीस यांनी सांगितले.
संकटात राजकारण नको : संजय राऊत
कोरोनाच्या संकटात सुरू असलेल्या राजकारणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांवर टीका केली आहे. सध्या सगळेच या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला साथ द्या. राजकारण करू नका, असं सांगतानाच संकट ही संधी मानून महाविकास आघाडी राजकारण करत नाही, असा टोला संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना विरोधकांवर घणाघाती हल्ला चढवला. सध्या सगळेच संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रसंगी एकमेकांचे दोष काढणं योग्य नाही. मुंबईसह राज्यात कोरोनावर नियंत्रण येत आहे. त्यामुळे राजकारण करण्याची गरज नाही. सर्वांनी एकत्रं येऊन काम करावं. तरच संकटाला तोंड देता येईल. सध्याच्या काळात राजकारण करणं योग्य नाही. राजकारण करण्याची आपली परंपरा नाही आणि सध्याच्या वातावरणात राजकारण करणंही योग्य नाही, असं सांगतानाच महाविकास आघाडी संकट ही संधी मानून कधीच राजकारण करत नाही, असं राऊत म्हणाले.