Top NewsUncategorized

मान्सून केरळमध्ये सक्रिय; महाराष्ट्रात ११ जूनला दाखल होण्याचा अंदाज

मुंबई : केरळच्या दक्षिण भागात मान्सून गुरुवारी सक्रिय झाला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून केरळमध्ये दोन दिवस उशिरा दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तर गेल्या काही दिवसांपासूनच दक्षिण-पश्चिम मान्सून केरळमध्ये पोहचणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. अखेर गुरुवारी केरळमध्ये यंदा मान्सून सामान्य परिस्थितीपेक्षा थोड्या उशिरानं का होईना दाखल झाला आहे. केरळच्या दक्षिण भागात मान्सूनच्या रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून पुढे सरकत महाराष्ट्र आणि तेलंगणात ११ जूनला दाखल होण्याची शक्यता आहे.

दरवर्षी केरळमध्ये साधारणतः नेहमी १ जूनच्या आसपास मान्सून हजेरी लावत असतो. मात्र, यंदा या मान्सूनला दोन दिवस उशीर झाल्याचे बघायला मिळाले. यापूर्वी भारतीय हवामान खात्याने मान्सून केरळमध्ये १ जून रोजी दाखल होईल, असे म्हटले होते. मात्र, त्यानंतर ३१ मे रोजी मान्सून दाखल होईल, असेही सांगण्यात आले होते. यानंतर नवी माहिती देत भारतीय हवामान खात्याने ३ जून रोजी मान्सून दाखल होईल, असे सांगितले आणि यानुसार केरळमध्ये आज मान्सून दाखल झाला. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप, दक्षिण केरळ, दक्षिण तामिळनाडू, कोमोरिन मालदिव भागात सक्रिय झाला आहे.

केरळमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत असून आज अखेर तो जोरदार बरसत दाखल झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून पुढे सरकत महाराष्ट्र ११ जून, तेलंगणा ११ जून, पश्चिम बंगाल १२ जून, ओडिशा १३ जून, झारखंड : १४ जून, बिहार आणि छत्तीसगड १६ जून, उत्तराखंड – मध्य प्रदेश २० जून, उत्तर प्रदेश २३ जून, गुजरात २६ जून, दिल्ली – हरयाणा २७ जून, पंजाब २८ मे, आणि राजस्थान २९ जून रोजी दाखल होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button