राणेंच्या राजीनाम्याच्या मागणीनंतर मोदींकडून तत्काळ प्रतिसाद; विनायक राऊतांची माहिती
रत्नागिरी : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केली आहे. यासंपूर्ण प्रकरणावरुन आज दिवसभर मोठ्या घडामोडी राज्याच्या राजकारणात घडत आहेत. ठिकठिकाणी राणेंविरोधात आंदोलनं आणि निदर्शनं सुरू होती. अखेर राणेंना अटक झाल्यानंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनीही एक महत्वाची माहिती दिली आहे.
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणाची दखल घेऊन त्यांची मंत्रिपदावरुन हकालपट्टी करावीअशी मागणी करणारं पत्र विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं होतं. या पत्रावर मोदींनी १० मिनिटांत प्रतिक्रिया दिल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला आहे. पंतप्रधान मोदींनी माझं म्हणणं ऐकून घेत तुम्ही याबाबची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना द्या, त्यांच्याशी बोला आणि त्यांची भेट घ्या, असं सांगितल्याचं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. ती अतिशय दुर्दैवी असून अशी भाषा सहन केली जाऊ नये. शिष्टाचार राखला गेला पाहिजे, असं विनायक राऊत यांनी पत्रात म्हटलं होतं. तसंच हे पत्र स्वत: मोदींना भेटून देणार असल्याचंही राऊत म्हणाले होते.