पुणे: मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांची आजपर्यंत संभाजीराजे छत्रपतींशी भेट होऊ शकली नाही, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. मराठा आरक्षणाविषयी संभाजीराजे यांनी त्यांचं मत मांडलं आहे. विनायक मेटे यांनीही आपली बाजू मांडली. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी आंदोलन झालं तर भाजपचे कार्यकर्ते त्यामध्ये पक्षाचा झेंडा आणि बॅनर बाजूला ठेवून सहभागी होतील, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर फार सविस्तरपणे बोलणे टाळले. तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण समाजातील दुर्बल घटकांविषयी चिंता व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण समाजासाठी अमृत महाडमंडळाची स्थापना केली. पण ते अजूनही सुरुच झालेले नाही. यामध्ये सरकारच्या दुरदृष्टीचा अभाव आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासाठी अनेक पत्र पाठवण्यात आली. मात्र, यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळाले नसल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.
ब्राह्मण समाजातील एक वर्ग हा मोठ्याप्रमाणात गरीब आहे. पौरोहित्य करणाऱ्या वर्गाला नियमित आर्थिक उत्पन्न नाही. त्यामुळे भाजपकडून ब्राह्मण कीर्तनकार आणि पौरोहित्य करणाऱ्या समाजाला अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना मराठा आरक्षणाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या अलिप्त भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली होती. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट हवी होती. त्यासाठी मी चारवेळेला पंतप्रधान मोदींना पत्रही दिले. मात्र, अद्याप त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.