नवी दिल्ली : उत्तर प्रदेश सरकारने नव्याने जारी केलेल्या ‘नमामि गंगे’ अभियानाच्या पोस्टरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची छायाचित्रे गायब झाली आहेत. पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्य योगी आदित्यनाथ यांच्यात सुरू झालेले शीतयुद्ध थांबविण्याची चिन्हे दिसत नसल्याचे संकेत मिळतात. उत्तर प्रदेश सरकारने या पोस्टरवरून मोदी आणि शहा यांची छायाचित्रे हटविण्याची ही पहिलीची वेळ आहे.
आपसातील शीतयुद्धामुळे योगी आदित्यनाथ यांनी हे पाऊल उचलले असावे, असे मानले जात आहे. तथापि, मोदी आणि शहा यांनी विधानसभेच्या आगामी निवडणुकीत ब्राह्मण समाजाचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. योगी यांचे महत्त्व कमी करण्यासाठी पर्यायी नेतृत्व उभे करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असे सूत्रांनी सांगितले. योगी आदित्यनाथ राज्यात ठाकूर समुदायाला महत्त्व देत ब्राह्मण समाजाची उपेक्षा करीत आहे, असा त्यांच्यावर आरोप आहे.
त्यामुळे पंतप्रधान मोदी ब्राह्मण समाजाला भाजपसोबत जोडण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी ए.के. शर्मा यांना उपमुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न केला; आता जितीन प्रसाद यांना भाजपमध्ये सामील करून ब्राह्मण समाजाला आकर्षित केले जात आहे. योगी आदित्यनाथ यांनीही हा डाव ओळखून आपली प्रतिमा सुधारण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. नमामि गंगे अभियानाचे नवीन पोस्टर, त्यांच्या या प्रयत्नांचाच एक भाग आहे.
…म्हणून मोदी, शहांची छायाचित्रे गायब?
बिहारमधील बक्सरमध्ये गंगा नदीतून ४० हून अधिक मृतदेह वाहत आल्याची धक्कादायक घटना गेल्याच महिन्यात समोर आली. उत्तर प्रदेशच्या सीमेलगत चौसा शहरात हे मृतदेह वाहत येऊन नंतर नदीच्या किनाऱ्याला लागले. हे मृतदेह करोनाबाधितांचे असल्याची तसेच त्यांचे दहन वा दफन करण्यासाठी जागा न मिळाल्याने अंत्यसंस्काराच्या नावाखाली ते नदीत टाकले गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही स्थानिकांच्या मते मात्र मृतदेहाचा आकडा १०० च्या आसपास आहे. यावरून केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांनी हल्लाबोल केला होता. या घटनेचा पंतप्रधानांच्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याने मोदी आणि शाह यांची छायाचित्रे ‘नमामि गंगे’ अभियानाच्या पोस्टरवरून हटकल्याचीही चर्चा आहे.