ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ३० कोटी डोस खरेदीचे मोदी सरकारचे लक्ष्य
नवी दिल्ली : देशात कोरोनावर प्रतिबंधात्मक उपचार म्हणून सर्वांचे लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत २१ कोटींहून अधिक जणांचे लसीकरण पार पडले आहे. पण यादरम्यान लसीचा तुटवडा भासत असून लसीकरणाचा वेग देखील काही ठिकाणी कमी प्रमाणात दिसत आहे. त्यामुळेच आता केंद्र सरकारने लसींचा तुटवडा दूर करण्यासाठी आणि लसीकरणाला वेग देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. जुलैच्या अखेरपर्यंत सरकारने २० ते २५ कोटी लसीचे डोस आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ३० कोटी डोस खरेदी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सीरम इस्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) कंपनी जून महिन्यात १० ते १२ कोटी कोविशिल्डचे डोस सरकारला देणार आहे.
आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, बिहार, दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये १८ ते ४४ वयोगटातील १० लाखांहून अधिक लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. देशात शनिवारी संध्याकाळपर्यंत एकूण २१ कोटी १८ लाख ३९ हजार ७६८ डोस देण्यात आले आहेत. ४० ते ६० वयोगटातील ६ कोटी ५३ लाख ५१ हजार ८७१ जणांना पहिला डोस आणि १ कोटी ५ लाख १७ हजार १२१ जणांचा दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच ६० वर्षांवरील ५ कोटी ८४ लाख १८ हजार २२६ जणांचा पहिला डोस आणि १ कोटी ८६ लाख ४३ हजार ७२० जणांचा दुसरा डोस देण्यात आला आहे.