Top Newsराजकारण

मोदी सरकारचा उद्या संध्याकाळी ६ वाजता मंत्रिमंडळ विस्तार

नवी दिल्ली: नरेंद्र मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या म्हणजे बुधवारी संध्याकाळी ६ वाजता पार पडणार आहे. या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हे भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण मंत्रिमंडळ असेल. कारण या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक तरुण चेहऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे, यामुळे मंत्रिमंडळाचे सरासरी वय खूपच कमी होईल, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या माध्यमातून महिलांचे प्रतिनिधित्व वाढविले जात आहे. प्रोफेशनल, मॅनेजमेंट, एमबीए, पदव्युत्तर युवा नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. मोठ्या राज्यांना अधिक वाटा देण्यात येईल. बुंदेलखंड, पूर्वांचल, मराठवाडा, कोकण या भागांना वाटा देण्यात येईल अशी चर्चा आहे. मंत्रिमंडळात लहान समुदायांना देखील प्रतिनिधित्व दिले जात आहे. यावेळी यादव, कुर्मी, जाट, पासी, कोरी, लोधी इत्यादी समाजाचे प्रतिनिधित्व दिसेल. या विस्तारानंतर दोन डझन ओबीसी किंवा मागासवर्गीय मंत्री यावेळी मंत्रिमंडळात दिसतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

शिवसेना आणि अकाली दल एनडीएमधून बाहेर निघाले तसेच रामविलास पासवान व इतर काही मंत्र्यांच्या निधनानंतर सर्व मिळून अनेक मंत्रिपदे रिक्त आहेत. सध्या मोदी मंत्रिमंडळात फक्त ५३ मंत्री आहेत. तर घटनेनुसार मंत्र्यांची संख्या जास्तीत जास्त ७९ असू शकते. त्यामुळे सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात २६ मंत्रिपदं रिक्त आहेत.

महाराष्ट्रातून खासदार नारायण राणे यांच नाव निश्चित मानलं जात आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या कार्यालयातून फोन आल्यानंतर राणे दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यानंतर राणे आणि नड्डा यांची भेट झाल्यानंतर राणेंच्या केंद्रीय मंत्रिपदावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तर भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनाही केंद्रीय राज्यमंत्रीपदाची संधी मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे दोन्ही खासदार सध्या दिल्लीत आहे. दरम्यान, राणे आणि पाटील यांना मंत्रिपदाबाबत विचारलं असता त्यांनी मौन बाळगल्याचं पाहायला मिळालं.

महाराष्ट्रातून भाजपचे नेते विनय सहस्रबुद्धे आणि नारायण राणे या दोन नावांची सध्या दिल्लीत जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे प्रवक्ते असणारे आणि भाजपचा थिंक टँक अशी ओळख असणारे विनय सहस्रबुद्धे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते, असं सूत्रांनी सांगितलं आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात जागा मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. दिल्लीतून त्यांना फोन आला असून संध्याकाळपर्यंत ते दिल्लीत पोहोचतील. तसेच वरुण गांधी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. संभाव्य फेरबदलात अनेक मंत्र्यांची नावं कमी केली जाऊ शकतात, तर काहींचा मंत्रिपदाचा भार कमी केला जाऊ शकतो. यामध्ये नरेंद्र सिंह तोमर, रवीशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल आणि प्रल्हाद जोशी यांच्याकडील अतिरिक्त जबाबदारी कमी केली जाऊ शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button