Top Newsराजकारण

एअर इंडियाच्या पाठोपाठ मोदी सरकार विकणार आणखी विमान कंपनी !

नवी दिल्ली : एअर इंडियाची टाटा उद्योग समूहास विक्री केल्यानंतर मोदी सरकारकडून एअर इंडिया ॲसेट होल्डिंग्ज प्रा. लि.चा (एआयएएचएल) भाग असलेल्या अलायन्स एअरची विक्री केली जाणार आहे. यातून येणारा पैसा एअर इंडियाचे कर्ज भरण्यासाठी वापरला जाणार आहे. या विक्रीनंतर भारतात कोणतीही विमान कंपनी अस्तित्वात राहणार नाही.

एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, अलायन्स एअर ही कंपनी एअर इंडियाची संपूर्ण मालकी असलेली विभागीय उपकंपनी होती. एअर इंडियाचे खासगीकरण करण्याचा निर्णय झाला तेव्ही ती वेगळी काढण्यात आली होती. आता टाटांनी एअर इंडिया आणि तिचे स्वस्त प्रवास युनिट एअर इंडिया एक्स्प्रेसमधील १०० टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे. तसेच ग्राऊंड हँडलिंग संस्था एआयएसएटीएस मधील ५० टक्के हिस्सेदारीही टाटांना मिळणार आहे. सूत्रांनी सांगितले की, ३१ ऑगस्टअखेरपर्यंत एअर इंडियावर ६१,५६२ कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यातील १५,३०० कोटींचे कर्ज टाटा समूहाकडे हस्तांतरित होईल. उरलेले ४६,२६२ कोटी रुपयांचे कर्ज ‘एआयएएचएल’कडे हस्तांतरित केले जाईल. एआयएएचएल ही विशेष हेतू वाहन (स्पेशल पर्पज व्हिहिकल) श्रेणीतील संस्था आहे. कर्जफेडीबद्दल सूत्रांनी सांगितले की, ‘एआयएएचएल’ च्या ताब्यातील इमारती आणि इतर स्थावर मालमत्तांच्या विक्रीतून १४,७०० कोटी रुपये मिळतील. तसेच अलायन्स एअरच्या विक्रीतून २ हजार कोटी रुपये अपेक्षित आहेत. कंपनीकडे १९ एटीआर विमाने आहेत.

जर सरकारने अलायन्स एअरची विक्री केली तर भारतामध्ये कोणतीही सरकारी विमान कंपनी राहणार नाही. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी स्वतंत्र विमान आहे. मात्र सरकारकडे विमान कंपनी नसेल. अन्य देशांमध्ये सरकारची स्वत:च्या मालकीची एकतरी विमान कंपनी असते. भारत मात्र त्याला अपवाद ठरणार आहे.

एअर इंडियाकडे १६ हजार कोटी रुपयांची बिले थकलेली असून त्यांचा भारही भारत सरकार उचलणार आहे. इंधन आणि पुरवठादारांची ही बिले आहेत. ती विशेष हेतू वाहन संस्थेकडे हस्तांतरित केली जातील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button