नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात इंधन दरवाढीचा भडका उडाला असून सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार आला आहे. पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे.
‘तुमची गाडी पेट्रोल-डिझेलवर चालत असेल पण मोदी सरकार कर वसुलीवर चालतं’ अशा शब्दांत राहुल यांनी बोचरी टीका केली आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. आज पुन्हा दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या. दिल्लीत पेट्रोलची किंमत १००.२१ रुपये आहे, तर डिझेल प्रति लिटर ८९.५३ रुपयांवर पोहोचले आहे अशी बातमी शेअर त्यांनी केली आहे. यासोबतच ‘तुमची गाडी पेट्रोल-डिझेलवर चालत असेल पण मोदी सरकार कर वसुलीवर चालतं’ असं देखील राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
आपकी गाड़ी चाहे पेट्रोल पे चलती हो या डीज़ल पे, मोदी सरकार टैक्स वसूली पे चलती है!#TaxExtortion pic.twitter.com/dnQu5m7D6T
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 7, 2021
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरून राहुल यांनी केंद्र सरकारवर याआधीही कित्येकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्याचं म्हणत टीकास्त्र सोडलं होतं. ‘निवडणुका संपल्या, पुन्हा लूट सुरू’ असं ट्विट केलं होतं. तसेच काही दिवसांपूर्वी ‘मोदी सरकारच्या विकासाची अशी परिस्थिती आहे की, जर एखाद्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढले नाहीत तर ती जास्त मोठी बातमी होते’ असं देखील म्हटलं होतं.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी या इंधन दरवाढीबद्दल खुलासा केला आहे. जनकल्याणाच्या योजनांमुळे इंधनाचे भाव वाढत असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंधन दरवाढीबद्दल अनेकदा स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र आता एका मुलाखतीत त्यांनी दरवाढीचं नवं कारण सांगितलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकारांशी बोलताना, मला मान्य आहे की, इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. पण एका वर्षात कोरोना प्रतिबंधक लसीच्या मात्रांवर ३५ हजार कोटींहून अधिक खर्च झाला आहे. गरीबांना आठ महिन्यांचा किराणा मोफत देण्यासाठीच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेवर एक लाख कोटी रुपये खर्च झाले. शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये काही रक्कम पाठवण्यात आली. तसंच तांदूळ आणि गव्हाच्या एमएसपी ची घोषणा करण्यात आली. त्याशिवाय देशात रोजगारासाठी, विकासकामांसाठी पैशांची गरज आहेच. अशावेळी आम्ही पैसे वाचवून ते पैसे लोककल्याणासाठी वापरत आहोत, असं म्हटलं आहे.