Top Newsराजकारण

इतिहासाला दोष देऊन मोदींना स्वतःच्या चुकांवर पांघरूण घालता येणार नाही : मनमोहन सिंग

मला ही अपेक्षा नव्हती; सीतारामन यांचे प्रत्युत्तर

नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंजाबच्या जनतेसाठी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. मनमोहन सिंग म्हणाले, लोकांना आपली चांगली कामे माहीत आहेत. त्यांनी (भाजप) पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून मुख्यमंत्री आणि पंजाबच्या जनतेचा अपमान केला आहे. आज तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की, श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत. तर गरीब आणि गरीब होत चालला आहे.

पंजाबी भाषेत जारी केलेल्या एका व्हिडिओ संदेशात मनमोहन सिंग म्हणाले, आजची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे, कारण सरकारच्या धोरणांमुळे कोरोना काळात महागाई, बेरोजगारी वाढत आहे. मनमोहन सिंग म्हणाले, विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या चुका सुधारण्याऐवजी देशाचे पहिले पंतप्रधान नेहरूंना दोषी ठरवत असतात.

आपल्या व्हिडिओ संदेशात मनमोहन सिंग म्हणाले, केंद्र सरकारने हे देखील समजून घेतले पाहिजे की, चेहरा बदलल्याने स्थिती बदलत नाही, जे काही खरे आहे ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात बाहेर येतेच! मोठमोठ्या गोष्टी बोलणं सोपं असतं पण त्या अंमलात आणणं खूप अवघड असतं.

माझ्यावर मूक, कमकुवत आणि भ्रष्ट असल्याचा आरोप करणाऱ्या भाजप सरकारच्या बी आणि सी टीमचा आज देशासमोर पर्दाफाश झाल्यामुळे मला दिलासा मिळाला आहे, असेही मनमोहन सिंग यांनी पंजाबला दिलेल्या व्हिडीओ संदेशात म्हटले आहे.

मनमोहन सिंग पुढे म्हणाले, आपण असे मानतो की, पंतप्रधानपदाची एक विशेष गरिमा आहे. यामुळे, इतिहासाला दोष देऊन आपले दोष कमी करता येणार नाहीत. तसेच, आपल्या १० वर्षांच्या कार्यकाळात आपण स्वतः अधिक बोलण्याऐवजी कामाला बोलू देणे पसंत केले. आपण राजकीय फायद्यासाठी सत्य झाकण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. देश आणि पदाची शान कधीही कमी होऊ दिली नाही, असेही सिंग म्हणाले.

मला ही अपेक्षा नव्हती; सीतारामन यांचे प्रत्युत्तर

आताच्या घडील देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांची धूम सुरू आहे. यातच देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपने पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून मुख्यमंत्री आणि पंजाबच्या जनतेचा अपमान केला आहे, अशी टीका मनमोहन सिंग यांनी केली. याला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मनमोहन सिंग तुमचा मी खूप सन्मान करते. मात्र, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.

मनमोहन सिंग यांनी पंजाबच्या जनतेसाठी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. याला निर्मला सीतारामन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सीतारामन म्हणाल्या की, त्यांना (मनमोहन सिंग) भारताला सर्वांत कमकुवत बनवल्याबाबत आणि देशातील तीव्र महागाईवरून स्मरण केले जाते. मला तुमच्याबद्दल (मनमोहन) खूप आदर आहे. परंतु, मला ही अपेक्षा नव्हती.

यावेळी एनएसईच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांनी देशातील सर्वांत मोठे स्टॉक एक्स्चेंज चालवण्यासाठी हिमालयातील योगींचा सल्ला घेतल्याच्या अलीकडील खुलाशांचा निर्मला सीतारामन यांनी उल्लेख केला आणि मनमोहन सिंग यांना सत्तेत असताना या सर्व गोष्टींचा सुगावाही लागला नाही, असा टोला लगावला. सीतारामन यांनी मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी यांच्या काळातील निर्यात आणि थेट विदेशी गुंतवणुकीची आकडेवारीच दिली.

दरम्यान, केंद्र सरकारने हेदेखील समजून घेतले पाहिजे की, चेहरा बदलल्याने स्थिती बदलत नाही, जे काही खरे आहे ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात बाहेर येतेच. मोठमोठ्या गोष्टी बोलणे सोपे असते पण त्या अंमलात आणणे खूप अवघड असते, असे परखड मत मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button