अमेरिकेच्या मॉडर्ना लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी
नवी दिल्ली : कोरोना विषाणूविरोधात जगभरात लसीकरण मोहीम वेगाने सुरु आहे. भारतात आत्तापर्यंत ४० कोटीहून अधिक नागरिकांनी लसीचे डोस देण्यात आलेत. मात्र लसींच्या कमतरतेमुळे बऱ्याच ठिकाणी लसीकरण मोहिमेत अडचणी येत आहेत. ज्यामुळे नागरिकांना लसीकरण केंद्रातून लस न घेताच परतावे लागत आहे. मात्र यात एक दिलासाजनक बातमी समोर आली आहे. भारताच्या औषध महानियंत्रक संस्थेने (डीसीजीआई) अमेरिकेच्या मॉडर्ना लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.
ज्यामुळे कोरोनाविरोधात आता मॉडर्ना लसीचे दोन डोस नागरिकांना दिले जाणार आहेत. १८ वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना ही लस दिली जाणार आहे. कमी मात्रा असणाऱ्या मॉर्डना लसीचे डोस कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिअंटचा सामना करण्यासाठी सक्षम असतील असं मॉडर्नाने म्हटलंय. मुंबईतील सिप्ला या औषध निर्माती कंपनी मॉर्डना लसीचे डोस अमेरिकेतून आयात करणार आहे.
गेल्या काही महिन्यांत अनेक देशांमध्ये मॉर्डना लसीच्या वापरास परवानगी देण्यात आली. कारण कोरोना विषाणू रोखण्यास ही लस अधिक प्रभावी ठरत असल्याचे म्हटले जात आहे. आता भारतातही या लसीच्या वापरास लवकरंच सुरुवात होण्याची शक्यता आहे. भारतात नागरिकांसाठी सध्या तीन लसींचा वापर केला जात आहे. यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोव्हिशील्ड, भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि रशियाच्या स्पुटनिक-व्ही लसीचा समावेश आहे.