नाशिक: नाशिक महापालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मनसेने आता आणखी एक मोठी घोषणा केली आहे. नाशिक महापालिका निवडणूक अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याची घोषणा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे. त्यामुळे नाशिक पालिका निवडणूक मनसेने अधिक गंभीरपणे घेतल्याचं दिसून येत आहे.
संदीप देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना ही मोठी माहिती दिली. अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे यांनी आज नाशिक पालिका आयुक्तांची भेट घेतली. आम्ही नाशिक महापालिका स्वबळावर लढणार आहोत. महापालिका निवडणुका अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात लढवल्या जाणार आहेत, असं देशपांडे म्हणाले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून नाशकात तयार झालेल्या प्रकल्पांची अमित ठाकरे यांनी पाहणी केली. काही ठिकाणी या प्रकल्पांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. त्यामुळे मनसेच्या काळातील या प्रकल्पांची राजकारण बाजूला ठेऊन सुधारणा करण्या यावी, अशी मागणी पालिका आयुक्तांना केली आहे. पालिकेच्या इंजीनिअर्सनी रस्त्यातील खड्डे बुजवले नाही तर त्या अभियंत्यांना त्याच खड्ड्यात मनसे बसवेल, असा इशाराही त्यांनी दिला.
मनसेच्या कामावर भाजपची पोळी
सत्ताधारी भाजपं, मनसेचे प्रकल्प स्मार्ट सिटी म्हणून दाखवते. मनसेच्या कामावर भाजपची पोळी भाजली जात आहे, असा आरोप करतानाच कामगारांना कोविड भत्ता मिळायला हवा. कालिदास रंगमंदिरात कलाकारांना दुय्यम मागणी मिळते आहे याकडे आयुक्तांचं लक्ष वेधल्याचं त्यांनी सांगितलं.