मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय. अशावेळी राज्यातील विविध पक्षांचे नेते आणि मंत्री एका मागोमाग एक कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. रोहित पवार आणि काँग्रेस आ. धीरज देशमुख या दोघांनाही आता कोरोनाची लागण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. रोहित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील उपचारासाठी ते पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत अशी माहिती मिळतेय. महत्वाची बाब म्हणजे रोहित पवार आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
लातूर ग्रामीणचे काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. देशमुख यांनी स्वत:च ही माहिती दिली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्याने सध्या मी पुढील उपचार घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे माझी तब्येत चांगली आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असं ट्वीट धीरज देशमुख यांनी केलं आहे.
युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनाही कोरोनाची लागण
युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे आढल्यानंतर त्यांनी चाचणी करुन घेतली होती. त्यानंतर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवलं आहे. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान याआधी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता युवासेनेने आपला झंझावात हा मेळावा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.