राजकारण

तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी एम.के. स्टालिन विराजमान

चेन्नई : नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीत भाजपाला धुळ चारत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, आज (शुक्रवार) द्रमुकचे प्रमुख एमके स्टालिन यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चेन्नईच्या राजभवनात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी स्टालिन यांना शपथ दिली. त्यांच्यासमवेत मंत्रिमंडळातील ३३ मंत्र्यांनीही शपथ घेतली. पक्षाचे नेते दुराई मुरुगन यांनी जलसंपदा मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

एमके स्टालिन यांनी मुख्यमंत्री पदासोबत राज्याचे गृहमंत्री म्हणूनदेखील शपथ घेतली आहे. याशिवाय त्यांच्याकडे प्रशासकीय आणि पोलीस सेवा, विशेष योजना आणि सार्वजनिक बांधकाम संस्थाच्या कल्याणकारी योजनांची जबाबदारी देखील असेल. २ मे रोजी झालेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये द्रमुकने एआयडीएमकेची सत्ता उलथून टाकली. एमके स्टालिन यांच्या नेतृत्वात असलेल्या द्रमुकला तामिळनाडूच्या राजकीय इतिहासात सहाव्या वेळी सत्तेत बसण्याची संधी मिळाली आहे. डीएमके २००६–११, १९९६–२००१, १९८९–९१, १९७१–७६ आणि १९६७–७१ या काळात राज्यात सत्तेत होती.

विधानसभेच्या २३४ जागांपैकी द्रमुक आघाडीला १५९ जागा मिळाल्या, त्यापैकी १33 द्रमुक, कॉंग्रेसला १८, व्हीसीकेला ४ तर सीपीएम, सीपीआयला २-२ जागा मिळाल्या. त्याचवेळी एआयडीएमके आघाडीला अवघ्या ७५ जागा मिळाल्या. त्यापैकी एआयडीएमकेला ६६, पीएमकेला ५ आणि भाजपला ४ जागा मिळाल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button