झोटिंग समितीचा गायब अहवाल सापडला; एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार?
मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कथित जमीन गैरव्यवहाराप्रकरणाची चौकशी करणारा झोटिंग समितीचा गायब झालेला अहवाल सापडला आहे. भोसरी जमीन प्रकरणातला झोटिंग समितीचा अहवाल गहाळ झाल्याचे वृत्त काल आलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. हा अहवाल नक्की कसा गायब झाला याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. पण या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले होते.
दरम्यान, झोटिंग समितीच्या अहवालात एकनाथ खडसे यांच्यावर मोठे आरोप करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भोसरी एमआयडीसीतल्या जमीन खरेदी प्रकरणात खडसेंना क्लीन चीट नव्हती, खडसेंनी गोपनियतेच्या शपथेचा भंग केला, मंत्रिपदाचा वापर करुन पत्नी आणि जावयाला फायदा होईल असे निर्णय घेतले, असे निष्कर्ष झोटिंग समितीने काढले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
भोसरी एमआयडीसीतल्या जमीन खरेदी प्रकरणामुळं राष्ट्रवादीचे नेते माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची ईडी चौकशी सुरू आहे. २०१७ मध्ये झोटिंग समितीने खडसे यांना भोसरी जमीन प्रकरणांमध्ये चौकशी सुरु केली होती. याच मुद्द्यावरुन खडसेंना महसूल मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पण भाजपमधल्या अंतर्गत वादामुळे तो अहवाल जाहीर झालाच नाही. पण आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर ईडीमार्फत आता त्यांची चौकशी सुरू झाली आहे. पण हा अहवाल आताच कसा गायब झाला असा प्रश्न भाजप निर्माण करत होतं.