मुंबई : भाजप आ. आशिष शेलारांच्या टीकेला महापौर किशोरी पेडणेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आशिष शेलार पत्रकार परिषद घेऊन दिशाभूल करत असल्याचा आरोप पेडणेकर यांनी केलाय. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून चर्चेत राहण्याचं काम भाजप करत आहे. मी आशिष शेलारांच्या आरोपांचं खंडण करते. आम्ही कोणतेही गुंड बोलावले नव्हते. शेलारांनी ज्यांचा उल्लेख केला ते आमचे शिवसैनिक होते. भाजपच्या काही अकार्यक्षम नगरसेवकांनी महिलांना पुढे केलं त्यामुळे हा प्रकार घडला. आम्ही गोणतीही गोष्ट लपवत नाही. शेलारांनी आम्हाला शिस्त शिकवू नये. शेलार आणि इतर असे १२ आमदार गैरवर्तन केल्यामुळे निलंबित झाले आहेत, हे त्यांनी विसरू नये. शेलारांनी विधिमंडळात गुंडगिरी केली होती. नायरमधील घटना दुर्दैवी आहे. कुणाचाही गळा दाब अशी भाषा मी केली नाही, असं पेडणेकर म्हणाल्या.
नायर रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका बाळाचा मृत्यू झाल्यानं भाजप आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेवर जोरदार हल्ला चढवला आहे. डॉक्टरांच्या चुकीमुळे एका बाळाचा मृत्यू झाला. त्यावरून प्रशासनाला जाब विचारायला जाणाऱ्या भाजपच्या नगरसेविकांशी असभ्य भाषेत बोललं जातं. त्यांना मारण्यासाठी गुंडांना बोलावलं जातं. ही अरेरावी कशासाठी? राज्यात काय गब्बरचं राज्य आहे का? असा सवाल शेलार यांनी केलाय.
पेडणेकर म्हणाल्या की, ते कृत्यू पाहून कोणताही नागरिक संतप्त झाला असता आणि त्याने जबाबदार असेल्यांचा गळा दाबला असता असं मी म्हणाले. मात्र शेलारांनी त्याचा जाणीवपूर्वक विपर्यास केला. त्याठिकाणी जाऊन या विषयाचं राजकारण केलं. भाजपच्या नगरसेविकांनी मला सभागृहात धमकी दिली. डेस्क फेकून देऊ, तुम्हाला ढकलून देऊ, असं त्या म्हणाल्या. नगरसेविका नेहल शाह, शितल गंभीर यांनी मला धमकी दिली. स्थायी समिती अध्यक्ष यांना मारहाण करण्यासाठी भाजपच्या नगरसेविका धावल्या. नेहल शाह, शितल गंभीर यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी पेडणेकर यांनी केली आहे.
दुर्दैवी घटनेचे भाजपकडून घाणेरडे राजकारण : यशवंत जाधव
वरळी येथील गॅस सिलिंडर स्फोटाची दुर्घटना व त्यानंतर नायर रुग्णालयात त्यांना उपचार देण्यात झालेला हलगर्जीपणा, जखमी लहान मुलाचा मृत्यू हे दुर्दैवी आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. अशी घटना कधीही घडू नये अशीच आमची भावना आहे. मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजप व त्यांचे नेते याचे निमित्त करून घाणेरडे राजकारण करीत आहेत. त्यामुळे ही बाब माणुसकीला काळिमा फासणारी आहे. भाजप व त्यांच्या नेत्यांनी इतक्या खालच्या पातळीवर येऊ नये, अशा शब्दात पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर तोफ डागली आहे.
वरळी व नायर प्रकरणाचे पडसाद शुक्रवारी पालिका सभेत उमटले होते. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, सदर घटनेवरून भाजप नगरसेवकांनी राजीनामे देऊन स्टंटबाजी व घाणेरडे राजकारण केल्याचा आरोप केल्याने भाजप नगरसेवक आक्रमक झाले होते व त्यामुळे नगरसेवकही आक्रमक झाले व दोन्ही पक्षाचे नगरसेवक एकमेकांना भिडले होते.
भाजपचे आ. शेलार यांनी, सदर घटनाप्रकारावरून शनिवारी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना व स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर आरोप करीत टीका केली. त्याची गंभीर दखल घेऊन यशवंत जाधव यांनी ताबडतोब आपली व शिवसेनेची भूमिका स्पष्ट करीत भाजप व शेलार यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
आशिष शेलारांचा आरोप
आशिष शेलार यांनी भाजपच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे. वरळी बीडीडी चाळीतील सिलेंडर स्फोटातील जखमींना नायर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका बाळाचा मृत्यू झाला आणि आता बाळाच्या वडिलांचा देखील मृत्यू झाला आहे. या घटनेवर शेलार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकारच्या मोठ्या दुर्घटनेनंतर रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात उपचारांसाठी जातात. पण तिथे सुरक्षित नाही. रुग्णांवर वेळेवर औषधोपचार होणार नाहीत. मुंबईच्या महापौर घटनेनंतर ७२ तासांनी रुग्णालयात पोहचल्या. ७२ तास कुठे झोपला होतात? मुंबई पालिकेत चाललंय काय? असा सवाल शेलार यांनी केला.