‘बार्ज’मधील निष्पाप कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला ओएनजीसी जबाबदार : नवाब मलिक
मुंबई : तोक्ते चक्रीवादळ समुद्र किनारपट्टीवर जोरदार प्रहार करणार हे संबधित यंत्रणेने सांगितलेले असतानाही ओएनजीसीने सर्व सूचनांकडे का दुर्लक्ष केले? सुरक्षा नियमांचे पालन का केले नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. कामगारांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने याचं उत्तर द्यायला हवं असंही नवाब मलिक म्हणाले.
तौत्के चक्रीवादळाबद्दल प्रत्येकाला अवगत करण्यात आले होते आणि सर्वांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा इशाराही देण्यात आला होता. स्थानिक सरकारी एजन्सींनी किनारपट्टीवरील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची व्यवस्था केली होती आणि मच्छीमारांना समुद्रात जाऊ नका, असंही सांगण्यात आलं होतं. मग ओएनजीसीने सर्व इशाऱ्यांकडे दुर्लक्ष का केलं आणि सुरक्षा नियमांचे पालन का केले नाही? चक्रीवादळ सुरू होण्यापूर्वी त्यांनी सर्व कामगारांना बार्जमधून बाहेर का काढले नाही आणि किनार्यावर आणले नाही? अशी प्रश्नांची सरबत्ती मलिक यांनी केली. ओएनजीसीमुळेच ६० निरपराध कामगारांचे जीव धोक्यात आले. या दुर्लक्षामुळे ६० लोक अजूनही बेपत्ता आहेत आणि बर्याच जणांनी आपला जीव गमावला, असा गंभीर आरोप मलिकांनी केलाय.
बार्जवर प्रभारी होते त्यांनी योग्यवेळी स्थानांतरण करण्याचा निर्णय घेतला नाही अशा लोकांवर कारवाई करुन शिक्षा करण्यात यावी, अशी मागणीही मलिक यांनी यावेळी केली आहे. या बचाव कार्यात भारतीय नौदल आणि तटरक्षक दल रेस्क्यू ऑपरेशन करून कामगारांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.
बॉम्बे हाय फिल्डच्या परिसरातील ‘बार्ज पी- ३०५’वरून गायब असलेल्या ८९ कर्मचाऱ्यांचा शोध अजूनही नौदलाकडून सुरुच आहे. या बार्जवर एकूण २७३ कर्मचारी होते. यापैकी १८४ जणांना नौदलाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून सुखरुप बाहेर काढले आहे. तर आतापर्यंत सहाजणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, अद्याप ८९ कर्मचारी गायब असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.