मेहबुबा मुफ्ती अनिश्चित काळासाठी नजर कैदेत
श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांना अनिश्चित काळासाठी नजर कैदेत ठेवण्यात आलं आहे. काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. सुरक्षा दलाच्या जवानांनी गेल्या काही दिवसांपासून अतिरेक्यांचं एन्काऊंटर सुरू केलं आहे. त्यावरून मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर सातत्याने हल्ला चढवला होता. तसेच अतिरेकी आणि जवानांच्या चकमकीत दोन नागरिक मारले गेल्याने मृतांच्या कुटुंबीयाने निषेध मोर्चा काढला होता. या मोर्चात सहभागी होण्यासाठी जात असताना मुफ्ती यांना रोखण्यात आलं आणि त्यांना पुढील आदेश येईपर्यंत नजर कैदेत ठेवण्यात आलं आहे.
मेहबुबा मुफ्ती या जम्मूला गेल्या होत्या. तिकडून येत असताना हैदरपोरा येथे सुरक्षा दल आणि अतिरेक्यांच्या चकमकीत ठार झालेल्या दोन नागरिकांच्या कुटुंबीयांनी निदर्शने आयोजित केली होती. या निदर्शनात सहभागी होण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले. त्यांना निदर्शनाच्या ठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला. तसेच त्यांना तत्काळ नजर कैदेत ठेवण्यात आले.
मुफ्ती यांनी गोळीबारात सामान्य नागरिक मारले गेल्याने त्याविरोधात बुधवारी निदर्शने केली. तसेच मारलेल्या नागरिकांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना देण्याची मागणीही त्यांनी केली. सशस्त्र दल विशेषाधिकार धिनियम जेव्हापासून लागू झाला आहे. तेव्हापासून निष्पाप लोकांना मारलं तरी त्यावर सरकार उत्तर देत नाही, असं मुफ्ती यांनी म्हटलं आहे. सोमवारी दहशतवाद विरोधी अभियानाच्या दरम्यान सुरक्षा दलाच्या गोळीबारात दोन नागरिकांसह चार लोक मारले गेले होते.
ज्यांच्या घरातील ही दोन माणसे मारली गेली. त्यांच्या घरातील लोक श्रीनगरमध्ये निदर्शने करत आहेत. मृतदेह ताब्यात देण्याची त्यांची मागणी आहे. मात्र, ही क्रूर सरकार हत्या केल्यानंतर मृतदेह सोपवण्यास नकार देत आहे. हे लोक गांधी, नेहरु आणि आंबेडकरांच्या या देशाला गोडसेंचा देश बनवू पाहत आहेत. मी अजून काय बोलू शकते? असा सवाल मुफ्ती यांनी केला आहे.