आरोग्य

ठाणे महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याकडून कोविड रूग्णालयातील साहित्य लंपास

ठाणे : मधल्या काळात कोरोनाचा प्रभाव कमी झालेला असताना ठामपाचे आरोग्य अधिकारी डॉ. मुरूडकर यांनी हे सर्व साहित्य लंपास केले असल्याचे उघडकीस आले आहे. जर, हे साहित्य जसे होते त्या स्थितीत ४८ तासात पुन्हा स्थानापन्न केले नाही तर आम्ही चोरीचा गुन्हा दाखल करू, असा इशारा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार कळवा आणि मुंब्रा भागात सक्षम आरोग्य यंत्रणा उभी केली होती. कौसा येथे म्हाडाच्या वतीने अद्ययावत असे कोविड रूग्णालयाची उभारणी केली होती. मात्र, सप्टेंबरनंतर कोरोनाचा कहर कमी झाला होता. हाच फायदा घेऊन डॉ. मुरूडकर यांनी सर्व साधने लंपास केली आहेत. कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी कौसा येथील रूग्णालयाची पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे डॉ. जितेंद्र आव्हाड हे प्रचंड संतप्त झाले आहेत. गोरगरीबांसाठी उभी केलेली ही यंत्रणा उद्ध्वस्त करणार्या डॉ. मुरूडकर यांना निलंबित करण्याची सूचना त्यांनी केली आहे. डॉ. आव्हाड यांनी सांगितले की, कोरोनाचा कहर वाढल्याने आपण म्हाडाने उभ्या केलेल्या रूग्णालयाची पाहणी करण्यासाठी गेलो असता , त्या ठिकाणी सर्व साधने अस्ताव्यस्त असल्याचे दिसून आले. सुरक्षा रक्षकांकडे विचारणा केल्यावर खरा प्रकार उघडकीस आला. ठामपाचे आरोग्य अधिकारी डॉ. मुरूडकर यांनी रूग्णालयातील सुमारे ९४ व्हेंटीलेटर्स आणि अन्य साहित्य लंपास केले आहेत. म्हाडाच्या मालकीची ही आरोग्य साधने काढून नेताना पाईपलाईनदेखील तोडून टाकण्याचे काम मुरूडकर यांनी केले आहे. ही साधने ठामपाच्या मालकीची नसतानाही ती नेऊन भाड्याने दिली आहेत. म्हाडाच्या मालकीची सुमारे बारा ते चौदा कोटींची आरोग्य साधने अशा पद्धतीने लंपास का केली? असा सवाल करीत अशा बेजबाबदार अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करावे, तसेच येत्या ४८ तासात सर्व साधने पूर्व स्थितीत आणून सुरू न केल्यास चोरीचा गुन्हा दाखल करू, असेही डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button