वरुण जन्माला आला तेव्हाच त्याच्या पाठीवर लिंबाएवढी एक गाठ होती. पाठीचा कणा विकसित होण्याच्या क्रियेत काही जनुकीय दोष निर्माण झाल्यामुळे असे होते. वयाच्या ४थ्या वर्षी तो वारंवार पडू लागला तसेच मूत्रविसर्जनावरील त्याचे नियंत्रण सुटू लागले. कारण, त्याच्या पाठीचा कणा ताणला जात होता आणि परिणामी आतड्याच्या व मूत्राशयाच्या कार्यासाठी जबाबदार मज्जातंतूंमध्ये बिघाड होत होता तसेच कमरेखालील अवयवांमधील शक्तीही कमी होत होती.
हा रुग्ण मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट हॉस्पिटलमधील ब्रेन अँड स्पाइन सर्जन डॉ. माझदा के. तुरेल यांच्याकडे आला आणि काही दिवसांतच त्याला शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. वरुणच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा झाली. आयुष्यात अनेक बाबींचे नुकसान भरून निघण्यास जसा वेळ द्यावा लागतो, तसाच वेळ मज्जातंतूंची हानी भरून काढण्यासाठी द्यावा लागतो. त्याच्या पायांची शक्ती मात्र अपेक्षेपेक्षा लवकर पूर्ववत झाली आणि त्याचे पडणे बंद झाले.
न्युरल ट्युब दोषांचे जागतिक स्तरावरील प्रचलन (इन्सिडन्स) परीक्षण करण्यात आलेल्या लोकसंख्येनुसार हजारात एक ते शंभरामध्ये एक अशा श्रेणीत बदलते. भारत या श्रेणीच्या मध्यावर कुठेतरी आहे. या दोषामागे जनुकीय कारण तर आहेच, शिवाय, गर्भधारणेपूर्वी आणि गरोदरपणात फॉलिक अॅसिड पुरेशा प्रमाणात न घेतल्यामुळे या दोषाचा धोका वाढतो. ग्रामीण भारतातील पोषणात्मक कमतरता भरून काढण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था आणि कुटुंब कल्याण कार्यक्रम पूरके (सप्लिमेंट्स) पुरवण्याचे काम करत आहेत.