मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांना ‘रिटेल एमई आयकॉन्स ॲवॉर्ड’
मुंबई : दुबईस्थित अल अदील ट्रेडिंगचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांना रिटेल एमई माध्यमगृहातर्फे नुकताच प्रतिष्ठेचा रिटेल एमई आयकॉन्स ॲवॉर्ड हा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. डॉ. दातार यांनी मध्य पूर्व व उत्तर आफ्रिका (मिडल इस्ट अँड नॉर्थ आफ्रिका- मीना) विभागात रिटेल उद्योगाच्या प्रगतीची आकांक्षा बाळगून दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. दुबईच्या बिझनेस बे भागातील जेडब्ल्यू मार्क्विस येथे नुकत्याच झालेल्या शानदार समारंभात रिटेल एमई तर्फे मीना विभागातील आघाडीच्या रिटेल लीडर्सची यादी जाहीर करण्यात आली. डमॅक समूहाच्या प्रकल्प विभागाचे सरव्यवस्थापक मुहम्मद अल– तहैने यांच्या हस्ते व दुबई डिपार्टमेंट ऑफ टुरिझम अँड कॉमर्स मार्केटिंगच्या अलायन्स अँड पार्टनरशिप विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लैला मुहम्मद सुहैल यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. दातार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. दातार म्हणाले, जगातील अत्यंत विश्वसनीय माध्यमगृहांपैकी असणाऱ्या रिटेल एमईतर्फे आमच्या कामाची दखल घेतली जाणे हा मोठा सन्मान आहे. संयुक्त अरब अमिरातीत भारतीय मसाल्यांबाबत आघाडीचे नाव असलेल्या आमच्या अल अदील समूहासाठीही ही आणखी एक अभिमानास्पद कामगिरी आहे. या पुरस्काराच्या निवडीत अत्यंत कठोर मार्गदर्शक तत्त्वे अवलंबली जात असल्याने आमच्यावर अधिक उत्तम कामगिरी करुन दाखवण्याची जबाबदारी आली आहे. आमच्या ग्राहकांना सामाजिक जबाबदाररीत्या वर्धित मूल्य मिळवून देण्यासाठी हा पुरस्कार प्रोत्साहक आहे. पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल मी रीटेल एमई ला धन्यवाद देतो. हा पुरस्कार हा एकप्रकारे माझी पत्नी सौ. वंदना, मुले हृषिकेश व रोहित आणि अल अदीलचा सर्व कर्मचारीवर्ग यांच्या पाठबळाचेच प्रतिबिंब आहे.
पुरस्कार संयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे त्या रिटेलर्सनी नेतृत्वाबरोबरच अभिनवतेचेही सुस्पष्ट उदाहरण दाखवून दिले आहे. विभागातील आघाडीच्या रिटेलर्सची ओळख जगाला पटवून देणे, हा या पुरस्कारामागील उद्देश आहे. प्रवर्तक त्यालाच म्हटले जाते जो सुप्त संधी बघतो, पायाभरणीचे धैर्य दाखवतो आणि साहसी शोधक वृत्तीने सीमोल्लंघन करतो. पुरस्कार यादीतील प्रवर्तक हे नवउद्योजक, चालक आणि प्रथम पाऊल उचलणारे असून त्यांनी या क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेत सर्वोच्च महत्त्वाची भक्कम रिटेल परिसंस्था उभारली आहे आणि त्यामध्ये अल अदील समूहाचाही गौरवपूर्वक समावेश आहे.
डॉ. धनंजय दातार यांच्या चैतन्यशील नेतृत्वाखाली अल अदील ट्रेडिंगने ९००० भारतीय उत्पादने संयुक्त अरब अमिरातीत (युएई) आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून स्वतःच्या पिकॉक या ब्रँडअंतर्गत तयार पिठे, मसाले, लोणची, मुरंबे, नमकीन, इन्स्टंट अशा श्रेणींत ७०० हून अधिक उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करुन दिली आहेत. मसाले व पिठे तयार करुन पॅकबंद करण्यासाठी डॉ. दातार यांनी दुबई इन्व्हेस्टमेंट पार्कमध्ये दीड लाख चौरस फुटांचा भव्य प्रकल्प उभारला आहे. त्यांच्या उद्योगाची भारतीय शाखा मसाला किंग एक्स्पोर्ट्स या नावाने मुंबईत कार्यरत आहे. अल अदील समूहाचे सध्या ४९ आऊटलेट्स असून लवकरच ५० वे आऊटलेटही सुरू होत आहे. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानयुक्त २ पिठाच्या गिरण्या व २ मसाला कारखाने असे जाळे दुबई, अबू धाबी, शारजा व अजमान येथे विस्तारले असून मुंबई निर्यात विभागाची शाखा मसाला किंग एक्स्पोर्ट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड नावाने मुंबईत आहे. अल अदील समूह सक्रिय विस्ताराच्या टप्प्यात असून त्याने अलिकडेच दुबईसह ओमान, बहारीन व सौदी अरेबियामध्ये नवी आऊटलेट्स उघडली आहेत. कंपनीने अमेरिका, कॅनडा, टांझानिया, केनया, स्वित्झर्लंड, इटली व एरित्रिया, तसेच कुवेत, ओमान व संयुक्त अरब अमिरातीत विशेष व्यापारी मार्ग स्थापन करुन आयात व निर्यात क्षेत्रातही विस्तार साधला आहे.