राजकारण

राजीव सातव यांच्या निधनामुळे अनेक नेत्यांना दुःख

मुंबई : राजीव सातव यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार राजीव सातव यांचे रविवारी कोरोनामुळे निधन झाले. गेल्या २४ दिवसांपासून राजीव सातव कोरोनाशी झुंज देत होते. त्यांनी कोरोनावर मातही केली होती. मात्र, त्यानंतर सायटोमॅजिलो या विषाणूची लागण झाल्याने त्यांची प्रकृती पुन्हा गंभीर झाली आणि आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

राहुल गांधी भावूक

राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. मी माझ्या मित्राला गमावले. राजीव सातव यांच्या निधनामुळे मी फार दु:खी आहे. ते कॉंग्रेसच्या आदर्शांना प्रत्यक्षात उतरवणारे एक नेते होते. त्यांच्याकडे प्रचंड क्षमता होती. त्यांचे जाणे हे आपल्या सर्वांसाठी फार मोठे नुकसान आहे. मी त्यांच्या कुटुंबियांप्रती संवदेना व्यक्त करतो, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त, मोठा धक्का : शरद पवार

शरद पवार यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

माणुसकी जपणारा नेता : सुप्रिया सुळे

राजीव सातव यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. काँग्रेसचे खासदार व आमचे संसदेतील सहकारी राजीवजी सातव यांचे निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद बातमी आहे. त्यांनी कोरोना विषाणूशी जोरदार झुंज दिली. पण ही झुंज अपयशी ठरली. ते एक उत्तम संसदपटू तर होतेच याशिवाय ते माणूसकी जपणारे नेते होते, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

राजकारणातला देवमाणूस गेला; वडेट्टीवार भावूक

त्यांच्या निधानाने काँग्रेस पक्षाचं कधीही भरुन न येणारं नुकसान झालंय. राजकारणातला देवमाणूस गेला, अशा शब्दात मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सातव यांना आदरांजली वाहिली. राजीव यांच्याबद्दलच्या आठवणी सांगताना वडेट्टीवार यांना गहिवरुन आलं. बोलता बोलता त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. राजीव सातव तरुण तडफदार होते. अभ्यासू नेते होते. कोणत्याही विषयांवर बोलू शकतील, असं त्यांच्याकडे ज्ञान होतं. जिद्दीने आणि चिकाटीने काम करणं त्यांच्या रक्तात होतं. त्यांच्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी आपली छाप दिल्लीत सोडली होती. व्यक्ती म्हणून ते हळवे होते. काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या भावना ते समजून घेऊन त्याच्यावर योग्य मार्ग काढत. आम्हाला नेहमी राजीव यांचं मार्गदर्शन लाभायचं. दिल्लीत गेल्यानंतर एक हक्काचा माणूस की ज्यांच्याकडे जाऊन त्यांना आपल्या भावना सांगाव्यात आणि त्यांनी ते प्रश्न सोडवावेत, असा नेता आम्ही गमावला, असं सांगत असताना वडेट्टीवार यांना अश्रू अनावर झाले.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची स्थापना झाली. मंत्रिमंडळ बनल्यानंतर मी काहीसा नाराज होतो. फडणवीस सरकार असताना मी विरोधी पक्ष नेता असल्याने आता सरकार आल्यानंतर साहजिक मंत्री बनल्यानंतर माझी खात्याबाबतीत काहीशी अपेक्षा होती. मी खात्यासंदर्भात नाराज आहे ही गोष्ट राजीवजींना समजल्यानंर त्यांनी मला फोन केला. मला दिल्लीला बोलावलं. मी त्यांना सांगितलं सध्या तरी येणं शक्य नाही. पण आणखी काही दिवसांनी मी दिल्लीला येऊन आपली भेट घेतो. त्यानंतर त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी माझ्याविषयी संवाद साधला.

राजीवजींनी फोन करुन मला सांगितलं. तुम्हाला जी जबाबदारी मिळाली आहे, ती नेटाने पार पाडा. तुम्हाला शोभेल अशी तुमच्यावर पुढे मोठी जबाबदारी काँग्रेस पक्ष देईल, काळजीचं काही कारण नाही. त्याची जबाबदारी मी घेतो, असं राजीव सातव मला म्हणाले. लागलीच मी त्यांना होकार दिला आणि पुढे माझं काम सुरु ठेवलं. माझ्यापेक्षा वयाने छोट्या असणाऱ्या राजीवजींनी मला समजावलं. माझ्या समस्येवर मार्ग काढला. माझी खंत जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासंबंधी आश्वस्त केलं. आज राजकारणातला देवमाणूस गेला, अशा भावना वडेट्टीवार यांनी व्यक्त केल्या.

कमी वयात देशाच्या राजकारणावर पाडलेली छाप कौतुकास्पद : नितीन गडकरी

युवा नेते आणि खासदार राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतीव दुःख झाले. राजीवजी यांनी अतिशय कमी वयात देशाच्या राजकारणावर पाडलेली छाप कौतुकास्पद होती. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे,अशा भावना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या आहेत.

जगन्मित्र हरपला: अजित पवार

काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राने, देशाने एक अभ्यासू, कार्यकुशल, आश्वासक नेतृत्व गमावले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचे मित्र आणि विश्वासू सहकारी असलेल्या राजीव सातव यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी जवळिकीचे, मित्रत्वाचे, सौहार्दाचे संबंध होते. राजीव सातव हे भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते. त्यांच्या निधनाने जगन्मित्र हरपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

तुला कोणत्या शब्दात श्रद्धांजली वाहू; संजय राऊत भावूक

राजीव सातव तू हे काय केलेस? राष्ट्रीय राजकारणात तुझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. तुझं हे असं जाणं भयंकर वेदनादायक आहे. चार दिवसापूर्वीच व्हिडीओ कॉलवर आपण नि:शब्द हाय, हॅलो केले. लवकरच बाहेर येण्याची तुझी विजयी मुद्रा माझ्या डोळ्यासमोर आहे. तुला कोणत्या शब्दात श्रध्दांजली वाहू?, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

भविष्यातील आश्वासक नेतृत्व गमावले : जयंत पाटील

सकाळी सकाळीच राजीव सातव यांच्या निधनाची आलेली बातमी दुःखद आहे. आमदार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य असा जबरदस्त प्रवास त्यांनी अत्यंत कमी वयात केला. गुजरात काँग्रेसचे प्रभारी म्हणून त्यांनी अत्यंत नेत्रदीपक असे काम केले. काँग्रेसचे भविष्यातील एक आश्वासक नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत होतो. सातव यांचे निधन ही काँग्रेसची मोठी हानी आहे. सातव परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

उत्साही आणि प्रसन्न व्यक्तीमत्वाला मुकलो : नितीन राऊत

काँग्रेस पक्षातील माझे सहकारी व खासदार राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक असून सातव कुटुंबासह काँग्रेस परिवारातील आम्हा सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काँग्रेस प्रति एकनिष्ठता, उत्साही, प्रसन्न व्यक्तिमत्व म्हणून ते सदैव स्मरणात राहतील, अशी भावना ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे.

नि:शब्द : अमोल मिटकरी

काँग्रेसचे गुजरातचे प्रभारी व नेते तसेच लोकसभेचे खासदार राजीवजी सातव यांचे दुःखद निधन झाले. काळाने एकमागून एक चांगली माणसे हिरावून न्यायला सुरुवात केली आहे. एक मोठं राजकीय नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं. निःशब्द, अशा शब्दात आमदार अमोल मिटकरी यांनी शोक व्यक्त केला आहे.

प्रामाणिक नेतृत्व गमावले : चंद्रकांतदादा पाटील

महाराष्ट्राचं उदयोन्मुख नेतृत्व ज्यांना राज्याची राजकीय स्थिती आणि सामाजिक प्रश्नांची जाण होती असे खासदार राजीव सातव यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनाची बातमी ही अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक निर्भिड, प्रामाणिक नेतृत्व गमावले आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button