नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिलेल्या एका लेखी उत्तरामुळे केंद्र सरकावर टीकेची झोड उठत आहे. ‘ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशात एकही मृत्यू झाला नाही’ असे लिखीत उत्तर पवार यांनी संसदेत केलं आहे. त्यावरुन विरोधी पक्षांसह नेटीझन्सनेही सरकारवर टीका केली आहे. दरम्यान, या उत्तरानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा एक व्हीडिओही व्हायरल होत आहे.
शिवसेना खासदार संजय राउत यांनीही केंद्र सरकारच्या उत्तरावर नाराजी व्यक्त करत सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर, दुसरीकडे नेटीझन्सनेही सरकारला धारेवर धरले आहे. त्यातच, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचा जुना व्हीडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, देशात ऑक्सीजनअभावी अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
माजी आयएएस अधिकारी सूर्यप्रताप सिंह यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मोदींच्या म्हणण्यानुसार युपीमध्ये ऑक्सिजनची कमतरता नव्हती, योगी आदित्यनाथ यांनी परिस्थिती चांगली हाताळली. मग, युपीतील लोकांना मरण्याचा शौक होता का, स्वत: मेले?. आठवतंय का, प्रयागराज उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचा झालेला मृत्यू हा गुन्हा असल्याचं म्हटलं होतं. नरसंहारपेक्षा कमी नाही. फक्त तुम्हीच खरे, बाकी खोटे…. असे ट्विट सिंह यांनी केलं आहे.
संजय राउत म्हणाले, केंद्रीय मंत्र्यांचे ते वक्तव्य ऐकून मी अवाक झालोय. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशात शेकडो हजारोंचा जीव गेला. ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले, त्यांना केंद्रीय मंत्र्यांचे वक्तव्य ऐकून काय वाटेल ? केंद्र सरकार खोटं बोलत आहे, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायला हवा, अशी मागणी राऊतांनी केली.
काँग्रेस खासदार के सी वेणुगोपाल यांनी मंगळवारी राज्यसभेत प्रश्न विचारला की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचा जीव गेलाय का? त्या प्रश्नाला उत्तर देताना नवनियुक्त केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, आरोग्य राज्यांचा विषय आहे. मृतांचा अहवाल राज्य आणि केंद्रशासित प्रदेश नियमितपणे आरोग्य मंत्रालयाला देत असतात. राज्य-केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे संसदेत गोंधळ सुरू झाला. काँग्रेसने सरकारवर निशाणा साधत सरकारला आंधळं आणि असंवेदनशील म्हटल आहे.