नवी दिल्ली : काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत चर्चेदरम्यान मिळालेल्या सूचना एकत्रित करून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदींना लसीकरणाला गती देण्याची सूचना केली आहे. कोरोनामुळे होणाऱ्या नुकसानीचा संदर्भ देत त्यांनी ५ सूचना दिल्या आहेत. मनमोहन सिंग म्हणाले आहेत की ४५ वर्षांखालील नागरिकांचं लसीकरण करण्यात यावं.
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होत आहे. तर दुसरीकडे लसीकरणाचा वेग देखील मंदावला आहे. या पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग यांनी मोदी यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाच उपाय सांगितले आहेत. लसीकरणाचा वेग वाढावावा लागेल, कारण कोरोनासोबतच्या युद्धामध्ये ते महत्वाचं आहे. किती लोकांना लसी दिली गेली आहे, हा आकडा पाहण्याऐवजी किती टक्के लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे, यावर लक्ष केंद्रीत करायला हवा, असं मनमोहन सिंग यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे.
मनमोहन सिंग पुढे म्हणाले की, सरकारने लसीबाबत कोणते आदेश दिले आहेत आणि पुढील सहा महिन्यांत लसींच्या डिलीव्हरीची स्थिती काय आहे ते सांगावं. कोरोनाविरुद्धच्या लढाईत परदेशी लसींना देखील भारतात परवानगी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग यांनी सध्या आपली स्थिती काय आहे असा सवाल केला आहे. कंपन्यांना किती डोस तयार करण्याचे ऑर्डर देण्यात आले आहेत. आगामी काळात लसींची कमतरता भासू नये म्हणून मोठ्या प्रमाणात लस मागवावी, असा सल्ला मनमोहन सिंग यांनी दिला आहे.
ज्या लसी येणार आहेत त्या लसी राज्यात कशा पोहोचतील याचीही काळजी घेतली पाहिजे. यामध्ये पारदर्शकताही असली पाहिजे. आपत्कालीन वापरासाठी १० टक्के लस ठेवावी. राज्यांना प्रंटलाईन वर्कर्स निश्चित करण्यासाठी सूट द्यावी. तसंच लसीकरणासाठी वयोमर्यादेतही सूट देण्यात यावी, असं मनमोहन सिंग यांनी सूचवलं आहे.
मनमोहन सिंग म्हणाले की, सरकारने हे पाहिले पाहिजे की ४५ वर्षे वयाखालील आरोग्य आणि फ्रंटलाईन वर्कर्सनाही लस देण्यात यावी. शालेय शिक्षक, बस-टॅक्सी-ऑटो चालक, नगरसेवक, पंचायत कामगार आणि वकील यांना देखील ४५ वयापेक्षा कमी असलं तरी लस द्यावी.
मनमोहन सिंग पुढे म्हणाले की, लस उत्पादकांना भारत सरकारने अधिक सवलती द्याव्यात. इस्त्राईलप्रमाणेच अनिवार्य परवाना देण्याच्या तरतुदी लागू केल्या पाहिजेत. युरोपियन मेडिकल एजन्सी किंवा यूएसएफडीएसारख्या विश्वासार्ह एजन्सींनी वापरण्यासाठी मंजूर केलेली कोणतीही लस देशांतर्गत आयातीसाठी वापरावी, अशी सूचना मनमोहन सिंग यांनी केली.