Top Newsराजकारण

अमृता फडणवीस यांच्या टिकेला मनीषा कायंदे यांचे जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, तसंच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह कुठे हनिमूनला गेले का? असा खोचक सवाल अमृता फडणवीस यांनी विचारलाय. एक पोलीस कमिश्नर असो किंवा माजी गृहमंत्री असो, त्यांचे कुठे हनिमून चाललेत आपल्याला माहीत नाही. पण हे व्हायला नको ही खरी घोष्ट आहे. तुम्हाला पण कुठे दिसले तर रिपोर्ट करा. लवकर पकडता येईल त्या लोकांना’, अशा शब्दात देशमुख आणि सिंह यांच्या गायब होण्यावरुन अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केलीय. त्यांच्या टीकेला आता शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्हाला भाजपकडून आमदार व्हायचंय, त्यामुळे तुम्ही अस्वस्थ आहात. बरं राहिला प्रश्न देशमुखांचा तर तुमच्याकडे विविध तपास यंत्रणा आहेत, तुम्ही शोधू शकताय ना, अशा शब्दात मनीषा कायंदेंनी अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय.

कायंदे म्हणाल्या, सामनातून भारतीय जनता पार्टीवर टीका होत असताना अमृता वहिनी मात्र अस्वस्थ होतात. आमच्याकडे तर अशी माहिती आहे की अमृता वहिनींना भाजपकडून आमदार व्हायचंय, प्रवक्ता व्हायचंय. त्यासाठी त्या भारतीय जनता पार्टीवर दबाव आणत आहेत. कायंदे पुढे म्हणाल्या, तुमच्याकडे सर्व तपास यंत्रणा आहेत. तुम्ही शोधू शकता!”. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “सामनाचे अग्रलेख वाचण्यासाठी विचारांची शक्ती लागते ती तुमच्याकडे नाही.

अमृता फडणवीसांची टीका

अमृता फडणवीस यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह कुठे हनिमूनला गेले का? असा खोचक सवाल करतानाच प्रकरणात एनसीबीकडून सुरु असलेल्या कारवाईचंही त्यांनी जोरदार समर्थन केलं आहे. इथे लोक ड्रग्ज घेऊन फिरतात. कारण कोणी दिलंय, लोकांनीच दिलंय ना. यावर काम करावं की नाही करावं, महाराष्ट्र प्रगतीच्या दृष्टीनं पुढे जावा की ड्रग्स कॅपिटल बनावा हे आपल्यालाच ठरवायचं आहे. यंग जनरेशनला तुरुंगात टाकावं हा माझा वैयक्तिक विचार नाही. त्यांना सुधारणागृहाची जास्त गरज आहे. पण त्या आधी ते कुठून येतंय, त्याचं नेटवर्क काय आहे हे कळायला पाहिजे. ते कळल्यावर त्या मुलाला तुरुंगाची नाही, तर रिहॅबिलिटेशन आणि काऊन्सिलिंगची गरज असते, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी एनसीबीच्या कारवाईचं समर्थन केलं आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांवर सुरु आहे. त्यावरुन महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत विचारलं असता, तुम्ही तशी कृती करता म्हणून आरोप होतो. तुम्ही जलयुक्त शिवार योजनेवर आरोप करता, मग तुमच्यावरही आरोप होणारच, असं प्रत्युत्तर त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना दिलं आहे.

त्याचबरोबर ‘सामना’तून होणाऱ्या टीकेलाही अमृता फडणवीस यांनी खोचक उत्तर दिलंय. ‘सामना’ टीका कुणावर करेल? जर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसवर टीका केली तर त्यांचं वसुली सरकार कसं चालेल? असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button