सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी यांची, तर उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची आज निवड झाली. दोन्ही उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा ११-७ अशा फरकानं पराभव केला आहे. महाविकास आघाडीच्या अध्यक्षपदासाठी व्हिक्टर डांटस यांनी अर्ज केला होता आणि सुशांत नाईक यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज केला होता. भाजपची एकहाती सत्ता बँकेवर आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जिल्हा बँकेत येऊन अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक जिंकणाऱ्या मनीष दळवी आणि अतुल काळसेकर यांचं अभिनंदन केलं आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वंदना खरमळे यांनी काम पाहिलं. ही प्रक्रिया जिल्हा बँकेच्या ओरोस प्रधान कार्यालयात पार पडली.
संतोष परब हल्ला प्रकरणी मनीष दळवी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्या घटनेमुळं जिल्हा बँकेची निवडणूक राज्य पातळीवर पोहोचला होता. त्या वादाचे पडसाद जिल्हा बँक निवडणुकीत उमटले होते. अखेर भाजपनं विजय मिळवल्यानंतर आज जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली.
ही निवडणूक खूप चर्चेत आली होती. त्यामुळं जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. शिवसेना आणि नारायण राणे यांच्या वादात मोठ्या प्रतिष्ठेची केलेल्या निवडणुकीत राणेंनी जिल्हा बँकेत पुन्हा सत्ता मिळवली आहे. निवडणुकीत ११ विरूद्ध ८ अशा फरकाने भाजपने सत्ता मिळवत महाविकास आघाडीला धक्का दिला आहे.
दरम्यान या निवडणुकीच्या आधी जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या बाहेर राणे समर्थकांनी नाद करायचा नाय अशा आशयाचा बॅनर लावला होता. सोबतच या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.