भवानीपूर : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर विधानसभा जागेसाठी झाले पोटनिवडणुकीत जबरदस्त विजय मिळविला आहे. ममतांनी भाजपच्या प्रियंका टिब्रेवाल यांचा ५८८३२ मतांनी पराभव केला. ममतांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेचा विषय बनली होती. या पोट निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना एकूण ८४७०९ मतं मिळाली. तर भाजपच्या प्रियंका टिब्रेवाल यांना २६३२० मतं मिळाली. तर सीपीएम उमेदवार श्रीजीब यांना केवळ ४२०१ मतेच मिळू शकली.
भाजप उमेदवार प्रियंका टिब्रेवाल यांनी आपला पराभव स्वीकारत म्हटले आहे, मी पराभव स्वीकार करते. पण, मी न्यायालयात जात नाही. ते लोक म्हणत होते, की ममता १ लाख मतांनी जिंकतील. पण त्यांना जवळपास ५० हजार मते मिळाली आहेत. मी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन करते. मात्र, त्यांनी ज्या पद्धतीने निवडणूक जिंकली, ते सर्वांनीच पाहिले आहे.
भवानीपूरमधील विजयानंतर ममता बॅनर्जी लोकांना संबोधित करताना म्हणाल्या, या विजयासाठी मी सर्वांचे आभार मानते. ममता म्हणाल्या, भवानीपूरमध्ये ४६ टक्के गैरबंगाली मतदार आहेत, प्रत्येकाने मला मतदान केले. यावेळी ममतांनी केंद्रावरही निशाणा साधला. एवढ्या लहानशा विधानसभा मतदारसंघासाठीही ३.५ हजार केंद्रीय दलाचे जवान तैनात करण्यात आले. आमच्या विरुद्ध षडयंत्र रचले गेले. त्यांनी नंदीग्राममध्ये झालेल्या पराभवाचा उल्लेख करत, हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे, त्यामुळे त्यावर काहीही बोलणार नाही, पण इथे काय झाले, हे लोकांनी पाहिले आहे, असेही ममता म्हणाल्या.
विजयानंतर जल्लोष करू नका
पश्चिम बंगालमध्ये तीन विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वी निवडणूक आयोगाने राज्य सरकारला पत्र लिहून कोणत्याही प्रकारचा जल्लोष न करण्याचे निर्देश दिले आहेत. याच बरोबर, निकाल आल्यानंतर राज्यात कुठल्याही प्रकारचा हिंसाचार होऊ नये, यासाठी कडक उपाय योजना आखण्यात याव्यात, असे या पत्रात सांगण्यात आले आहे. तत्पूर्वी, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. त्या घटनांसाठी भाजपने टीएमसी समर्थकांना जबाबदार धरले होते.
विरोधकांची मोट बांधण्यासाठी तृणमूल प्रयत्नशील
विधानसभा पोटनिवडणुकीतील ममता बॅनर्जी यांचाय विजय हा बंगालपूरता मर्यादित असणार नाही. राष्ट्रीय राजकारणात ममता बॅनर्जी यांचं स्थान अधिक गडद होणार आहे. तसंच विरोधकांची मोट बांधण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना अधिक गती प्राप्त होणार आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन करताना ” ममता दीदी जी की जीत है वही तो सत्यमेव जयते की रीत है” असं म्हटलंय. त्यामुळे पुढील काळात भाजप विरोधात पुन्हा एकदा विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न झाला तर संयोजक म्हणून ममता बॅनर्जी यांच्याकडे पाहिलं जाऊ शकतं. त्याचबरोबर विरोधकांच्या एकजुटीचा त्या चेहरा बनू शकतील. महत्वाची बाब म्हणजे याबाबत तृणमूल काँग्रेसनं यापूर्वीच जाहीर केलं आहे की ममता बॅनर्जी देशाला मार्ग दाखवतील. अभिषेक बॅनर्जी यांनी काँग्रेस शांत बसली असेल तर टीएमसी बसून राहणार नाही, असं वक्तव्य करून तृणमूल काँग्रेसची पुढील दिशा स्पष्ट केली आहे.