पश्चिम बंगालमध्ये ममतांचा सफाया होणार : नरेंद्र मोदी
ममता बॅनर्जींनी जनतेचा विश्वासघात केला; पंतप्रधानांचं वक्तव्य
कोलकाता : येत्या काही दिवसांत पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी आता भाजपनंही पूर्णपणे जोर लावण्यास सुरूवात केली आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकात्यातील ब्रिगेड मैदानात सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी आपल्या भाषणाची सुरूवात भारत माता की जय या घोषणेनं केली. “बंगालच्या पवित्र भूमीला मी नमन करतो. बंगालच्या या भूमीनं आमच्या संस्कारांना ऊर्जा दिली आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनादरम्यानही बंगालनं प्राण फुंकले होते. परंतु आता ममता बॅनर्जी यांनी बंगालला धोका दिला आहे,” असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल करत लोकसभेत तृणमूल काँग्रेस अर्धी झाली, यावेळी ती पूर्णच साफ होणार असल्याचं म्हटलं.
“पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन आणण्यासाठी या ठिकाणच्या नागरिकांनी ममता बॅनर्जींवर भरवसा केला होता. परंतु त्यांनी हा भरवसा तोडला आहे. या लोकांनी बंगालचा अपमान केला आहे. या ठिकाणच्या मता-भगिनींवर अत्याचार केला आहे. यावेळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकीकडे टीएमसी आहे, लेफ्ट-काँग्रेस आणि आहे आणि त्यांची बंगाल विरोधी वृत्ती आहे. तर दुसरीकडे स्वत: बंगालची जनता कंबर कसून उभी आहे. आज तुम्हा लोकांकडे पाहून कोणाच्याही मनात कोणतीही शंका येणार नाही. काही लोकांना तर आज २ मे आहे असंच वाटत असेल,” असं मोदी म्हणाले.
“मी या ठिकाणी परिवर्तानाचा विश्वास घेऊन आलो आहे. बंगालच्या विकासाचा विश्वास घेऊन आलो आहे. बंगालमध्ये बदल घडवण्याचा, गुंतवणूक वाढवण्याचा, पुनर्निर्माणाचा विश्वास देण्यासाठी मी आलो आहे. या ठिकाणी तरूण, शेतकरी, उद्योजक, माता-भगिनी यांच्या विकासासाठी आम्ही २४ तास दिवसरात्र मेहनतीनं काम करु. आम्ही मेहनत करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही.” असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
आपल्या संबोधनादरम्यान मोदींनी ममता बॅनर्जींवर जोरदार निशाणा साधला. “तुम्ही केवळ बंगालच्याच नाही तर भारताच्याही सुपुत्री आहात. काही दिवसांपूर्वी जेव्हा तुम्ही स्कूटी सांभाळली, तेव्हा तुम्ही सुरक्षित राहाव्या अशी सर्वजण प्रार्थना करत होते. चांगलं झालं तुम्ही पडल्या नाहीत. नाहीतर ज्या राज्यात ती स्कूटी तयार झाली होती त्याच राज्याला आपला शत्रू बनवलं असतं,” असं मोदी म्हणाले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेचे नेते खासदार राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. आजकाल आमचे विरोधक म्हणताता की मी मित्रांसाठी काम करतो. आपण सर्वच जाणतो की ज्या ठिकाणी आपण लहानाचे मोठे झालो, ज्या ठिकाणी खेळलो, ज्यांसोबत शिकलो ते आपल्या आयुष्यभराचे मित्र होतात. मी गरीबांमध्ये लहानाचा मोठा झालो आणि त्यामुळेच त्यांचं दु:ख काय आहे हे समजतो. यासाठीच मी मित्रांसाठी काम करतो आणि त्यांच्यासाठी काम करतच राहणार असल्याचंही त्यांनी सष्ट केलं.
मिथुन चक्रवर्तींचा भाजपात प्रवेश
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांच्या भेटीपासून ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती भाजपात जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्याचा खुद्द मिथून चक्रवर्ती यांच्याकडून इन्कार केला जात होता. काल (६ मार्च) सायंकाळी मिथून यांनी पश्चिम बंगाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष कैलास विजयवर्गीय यांची भेट घेतल्यानंतर ते भाजपात प्रवेश करणार असल्याचे ठामपणे सांगितले जात होते. त्यामुळे मिथून चक्रवर्ती फक्त मोदींसोबत व्यासपीठावर हजेरी लावणार की पक्षात प्रवेश करणार याकडे लोकांचे लक्ष लागले होते. अखेर भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले असून, पंतप्रधानांच्या सभेपूर्वी त्यांनी कमळ हाती घेतले.
२०११ मध्ये मिथुन होते टीएमसीत
२०११ मध्ये मिथुन यांनी ममता बॅनर्जी यांच्या विनंतीवरून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तृणमूलने त्यांना राज्यसभेवर पाठवले होते. मात्र, २०१६ मध्ये मिथुन यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत राजकीय सन्यास घेतला होता. मात्र, भागवत यांच्या भेटीनंतर मिथुन चक्रवर्ती भाजपात प्रवेश करुन पुन्हा एकदा राजकारणात पाऊल ठेवणार असल्याच्या चर्चा सुरू झाली होती. आज पुन्हा एकदा मिथून यांनी बंगालच्या राजकारणात पाऊल ठेवले आहे.