कोरोनाने मृत्यू झालेल्या ‘महिंद्रा’ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना पाच वर्षांचा पगार, मुलांच्या शिक्षणाचा खर्चही उचलणार
मुंबई : देशात कोरोना संसर्गाच्या वाढत्या घटनांदरम्यान भारतीय उद्योग जगताने आपल्या कर्मचार्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासह ते केंद्र आणि विविध राज्य सरकारांना मदत करण्यासाठी पावले उचलत आहेत. अनेक कंपन्या कोव्हिड-19 या साथीच्या आजाराने संक्रमित झालेल्या कर्मचार्यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत, औषधे आणि इतर मदत पुरवित आहेत. दरम्यान महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या कर्मचार्यांसाठी मदत जाहीर केली आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड कंपनीने आपल्या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला त्या कर्मचाऱ्याचं पाच वर्षांचं वेतन आणि वार्षिक उत्पन्नाच्या दुप्पट रक्कम देण्याचे जाहीर केले आहे. महिंद्राच्या कौटुंबिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत ही मदत दिली जाणार आहे. महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनीश शाह यांनी आपल्या कर्मचार्यांना लिहिलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे.
मुलांच्या शिक्षणासाठी दरवर्षी 2 लाख रुपये
महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या कर्मचार्यांसाठी फॅमिली सपोर्ट पॉलिसी आणली आहे, ज्याअंतर्गत कंपनी आपल्या कोणत्याही कर्मचार्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांच्या १२ वी इयत्तेपर्यंतच्या शिक्षणासाठी प्रत्येक मुलाला वर्षाकाठी दोन लाख रुपयांपर्यंतची मदत करेल.
शाह यांनी एमअँडएमच्या २५ हजार कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, कोव्हिड – १९ च्या प्रादुर्भावामुळे पीडित असलेल्या कुटुंबांवरील ओझं थोडं कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. काही कुटुंबांना आपल्या प्रिय व्यक्तीच्या अचानक निधनाचा सामना करावा लागला आहे, त्याचवेळी घर चालवण्याची अनपेक्षित जबाबदारी स्वीकारावी लागली आहे. अशावेळी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्या मदतीसाठी आम्ही सज्ज आहोत.
महिंद्राने वाहनांची वॉरंटी वाढवली
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने जाहीर केले आहे की, ते आपल्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी वाढवित आहेत. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे, याच पार्श्वभूमीवर कंपनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी १ एप्रिल २०२१ ते ३१ मे २०२१ दरम्यान संपणार आहे. ती मुदत आता ३० जून २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच महिंद्राने वॉरंटी पीरियड एक्सटेंशन आणि शेड्यूल मेंटेनन्स तसेच फ्री सर्व्हिसिंगची सुविधा सर्व गाड्यांवर देऊ केली आहे. ज्यामध्ये Thar SUV, Bolero, Scorpio, XUV300 या गाड्यांचा समावेश आहे.
कंपनीने अशा वेळी ही घोषणा केली आहे, जेव्हा ग्राहकांना घराबाहेर पडताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे ग्राहक त्यांची कार सर्व्हिस सेंटरवर नेऊ शकत नाहीत. अनेक राज्यांमध्ये वेगवेगळी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. कुठे लॉकडाऊन, कुठे संचारबंदी तर कुठे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत ऑटोमोबाईल कंपनीचा हा निर्णय ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे.