राजकारण

मुंबईतील कोरोना बळींच्या आकड्यांत हेराफेरी; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

मुंबई: कोरोनाचं भय वाढणार नाही याची काळजी घेतानाच अभासी चित्रं निर्माण करणंही परवडणार नाही, असं सांगतानाच मुंबईतील कोरोना बळींचा आकड्यांत हेराफेरी होत असल्याचा, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात कोरोना परिस्थितीचं विदारक चित्रं मांडतानाच अनेक मुद्द्यांकडे मुख्यमंत्र्यांचं लक्षही वेधलं आहे. कोरोनाचे भय वाढणार नाही, याची काळजी घेतानाच आभासी चित्र निर्माण करण्याचा गाफिलपणा या काळात परवडणार नाही. त्यामुळे चाचण्यांच्या तुलनेत संसर्ग दर आणि अचूक बळीसंख्या यातूनच कोरोनाविरोधातील लढ्यासाठी योग्य आधार प्राप्त होऊ शकतो, असं फडणवीस यांनी नमूद केलं आहे.

आपल्याला जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ द्यायचे नाही. कोरोना कमी व्हावा, ही आपल्या सर्वांचीच इच्छा आहे. मात्र, संसर्गदर १५ टक्क्यांच्या पुढे असताना कोरोना कमी होतोय, असे आभासी चित्र तयार करणे योग्य होणार नाही. कोरोना लाटेची सायकल आपण राज्यात, देशात आणि जगात अनुभवली आहे. या सायकलदरम्यान आरोग्य सेवा आणि रुग्ण व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. शिखरावर गेल्यावर पुन्हा रुग्णसंख्या मॉडरेट होते आणि कमी झाल्यावर श्रेयाचे दावेही जनतेने बघितले आहेत. परंतु महत्त्वाचे हे की, हा शिखरावरचा वेळ कमीत कमी कसा करता येईल आणि त्यादरम्यान आपत्ती कशी कमी करता येईल, हे अधिक महत्त्वाचे आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

गेल्यावर्षी कोरोनाच्या कमी चाचण्या होत होत्या. त्यावेळी मी तुम्हाला पत्र लिहून सातत्याने माहिती दिली होती. आज दुसर्‍या लाटेची तीव्रता अधिक असताना पुन्हा एकदा काही बाबी आपल्या निदर्शनास आणून देणे, हे मी माझे कर्तव्य समजतो. मुंबईत गेल्या ८ दिवसांत अतिशय कमी चाचण्या झाल्या आहेत. १९ एप्रिलला ३६,५५६; २० एप्रिल रोजी ४५,३५०; २१ एप्रिल रोजी ४७,२७०; २२ एप्रिल रोजी ४६,८७४; २३ एप्रिल रोजी ४१,८२६; २४ एप्रिल रोजी ३९,५८४; २५ एपिल रोजी ४०,२०९, २६ एप्रिल रोजी २८,३३८ अशा चाचण्या झाल्या आहेत. त्याची सरासरी ४०,७६० इतकी आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

नागपूर जिल्ह्यात ४० लाख लोकसंख्येत या कालावधीतील ही सरासरी २६,७९२ चाचण्या प्रतिदिन अशी असून ६८ लाखांच्या पुण्यात २२ हजार चाचण्या प्रतिदिन इतकी आहे. या शहरांच्या तीन ते चारपट लोकसंख्या असलेल्या मुंबईत केवळ ४० हजार प्रतिदिन चाचण्यांनी शहराचे नेमके चित्र लक्षात येणार नाही आणि त्यातून कोरोना स्थिती हाताळणे भविष्यकाळात पुन्हा कठीण होऊन बसेल, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.

कोरोना बळींच्या आकड्यांचा ताळमेळ नाही

मुंबईच्या बाबतीत अतिशय सजगतेने काम करण्याची गरज आहे. कारण, मुंबईतून संक्रमित लोक हे गावी गेले आहेत. गेल्या लाटेत त्यांचे ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग जसे झाले होते, तसे आता होताना दिसत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचे प्रमाण वाढते आहे. मुंबईची मृत्यूसंख्या सुद्धा सातत्याने दडविण्याचे काम होते आहे. रिकन्सिलिएशनचे काम अजून पूर्णत्त्वास गेलेले नाही. त्यामुळे जुनी मृत्यूसंख्या नंतर टप्प्याटप्प्याने अधिक करून नेमके चित्र उभे राहणार नाही. मुंबईच्या घाटांवर रोज अंत्यसंस्कार होणारे मृतदेह आणि रोजची दिली जात असलेली मृत्यूसंख्या याचा कुठेही ताळमेळ नाही. हीच परिस्थिती राज्यांतील अन्य जिल्ह्यांत सुद्धा आहे. गेल्या काही दिवसांत जुने मृत्यू नोंदविण्याच्या प्रक्रियेमुळे राज्यात अवघ्या ७ दिवसांत ४४६० मृत्यू नोंदण्यात आले आहेत. राज्यातील एकूण कोरोनाबळींच्या संख्येत एकट्या मुंबईत २० टक्के मृत्यू आहेत. त्यामुळे मुंबईसह राज्याच्या कोणत्याच भागाकडे दुर्लक्ष परवडणारे नाही. त्यामुळे मुंबईत तर चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढवाव्याच लागतील, शिवाय राज्याच्या अन्य भागात सुद्धा ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हे तत्त्व काटेकोरपणे पाळण्याची गरज आहे. त्यातही केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे आरटीपीसीआर चाचण्यांचा पुरेसा समतोल राखण्यात यावा, असंही त्यांनी म्हटलं आहे.

आरटीपीसीआर आणि अँटीजेन चाचण्यांच्या प्रमाणाचा विचार केला तर राज्यात जवळजवळ ४० टक्के चाचण्या या अँटीजेन पद्धतीने होत आहेत. २६ एप्रिल रोजी नोंदलेल्या मुंबईतील २८ हजार चाचण्यांमधील ४० टक्के अँटीजेन चाचण्या गृहित धरल्या तर केवळ १६,८०० आरटी-पीसीआर चाचण्या मुंबईत होत आहेत. इतक्या कमी संख्येत जर आरटीपीसीआर चाचण्या होत असतील, तर मुंबईचे नेमके चित्र डोळ्यापुढे येऊच शकणार नाही. मुंबईचा संसर्ग दर हा सातत्याने १४ ते १८ टक्के असताना आणि राज्याचा संसर्ग दर २५ ते २७ टक्क्यांच्या आसपास राहत असताना एकूणच कमी चाचण्या आणि त्यातही कमी आरटीपीसीआर चाचण्या हे अजिबात परवडणारे नाही, असं त्यांनी नमूद केलं आहे.

केंद्राच्या निर्देशाचे उल्लंघन

राज्यात रविवारी २५ एप्रिल रोजी एकूण २,८८,२८१ चाचण्या नोंदविण्यात आल्या. त्यातील १,७०,२४५ आरटी-पीसीआर चाचण्या होत्या (५९ टक्के), तर १,१८,०३६ चाचण्या या रॅपिड अँटीजेन (४१ टक्के). तसेच सोमवारी दि. २६ एप्रिल रोजीचे सुद्धा चित्र असेच आहे. त्यादिवशी ३७ टक्के अँटीजेन चाचण्या आहेत. आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण ७० टक्क्यांच्या वर हवे, असे केंद्र सरकारच्यावतीने सातत्याने सांगितले जात असताना सुद्धा त्याचे पालन होताना दिसत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button