चिंताजनक : महाराष्ट्रात दिवसभरात आढळले १० हजारांवर नवे करोनाबाधित रुग्ण
मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात करोनाचा पुन्हा प्रसार होऊ लागल्याचं चित्र दिसत आहे. त्या अनुषंगाने काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर करोनाबाधितांचा रोज वाढणारा आकडा राज्य सरकारसाठी आणि आरोग्य प्रशासनासाठी देखील चिंतेची बाब ठरला आहे. शुक्रवारी दिवसभरात राज्यात एकूण १० हजार २१६ करोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे एकूण करोनाबाधितांची संख्या आता २० लाख ५५ हजार ९५१ झाली आहे. त्याच वेळी राज्यात गेल्या २४ तासांत करोनामुळे ५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ५२ हजार ३९३ इतका झाला आहे. यामध्ये राज्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे करोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा सातत्याने ९२ ते ९३ टक्क्यांचा आसपास राहिला आहे. ताज्या आकडेवारीच्या आधारावर महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट ९३.५२ टक्के इतका नोंदला गेला आहे.
आज दिवसभरात राज्यात एकूण ६ हजार ४६७ करोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये लक्षणं असलेले आणि लक्षणं नसलेले अशा दोन्ही प्रकारच्या करोनाबाधितांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता अवघी ८८ हजार ८३८ इतकी राहिली आहे. यामध्ये सर्वाधिक १८ हजार ४०१ अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यामध्ये असून मुंबईत ९ हजार ५५ रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. नागपूरमध्ये देखील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ११ हजार ५५२ वर पोहोचली आहे. दरम्यान, आजपर्यंत राज्यात १ कोटी ६६ लाख ८६ हजार ८८० व्यक्तींची करोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी २१ लाख ९८ हजार ३९९ व्यक्ती अर्थात चाचणी केल्यापैकी १३.१७ टक्के व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.