आरोग्य

नाशिकमधील लॉकडाऊनचे निर्बंध २३ मे पासून शिथिल

छगन भुजबळ यांची घोषणा

नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात १२ मे पासून ते २२ मे पर्यंत १० दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. हा लॉकडाऊन उद्या संपत असल्याने यापुढे शासन काय निर्णय घेणार याची उत्सुकता लागलेली असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. जिल्ह्यात २३ मे नंतर लॉकडाऊन शिथिल करण्यात येईल, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.

नाशिकमध्ये कडक लॉकडाऊन काळात नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळून करोना संसर्ग साखळी तोडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न होता. या प्रयत्नात पूर्णपणे यश आलं नसलं तरीही कडक लॉकडाऊनमुळे लोकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आता २३ मे नंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, १० दिवसांच्या लॉकडाऊन काळात पोलीस चांगलेच आक्रमक झाले होते. पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना दंडुक्याचा प्रसाद दिला. या काळात शहरात ४० ठिकाणी नाकाबंदी पॉइंट्स होते.

नाशिक जिल्ह्यातील फळभाज्या व पालेभाज्या यांच्या विक्रीचे मुख्य मार्केट मार्केट म्हणून नाशिक बाजार समितीची ओळख आहे. येथून सर्वाधिक भाजीपाला हा मुंबईला पाठविण्यात येतो. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत विविध टप्प्यांत शेतमालांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असल्याने हा परिसर कायम गजबजलेला असतो. कोरोनाच्या काळात नियमांचे पालन करण्याच्या दृष्टीने येथे उपाययोजना केल्या जात असल्या तरी सुरक्षित अंतराचे नियम पाळणे या गर्दीच्या ठिकाणी शक्य होत नसल्याचे रोजच्या व्यवहाराच्या वेळी दिसत होते. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेत बाजार समितीतील व्यवहार १२ मे रोजी दुपारपासून बंद करण्यात आले. बाजार बंद झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात असलेल्या शेतमालाच्या विक्रीचा प्रश्न निर्माण झाला. रोज साडेतीन ते चार कोटी रुपयांची उलाढाल होणाऱ्या या बाजारात आठ दिवसांत ३२ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button