नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव देशात अजूनही सुरू आहे. मात्र, आता कोरोनाच्या नवीन रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. राजधानी दिल्लीत आता कोरोनाच्या नवीन केसेस मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. हे पाहता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज हळूहळू दिल्ली अनलॉक करण्याची घोषणा केलीय. जनतेच्या मागणीनुसार आणि तज्ज्ञांच्या मतांच्या आधारे आम्ही हळूहळू लॉकडाऊन उघडण्याची प्रक्रिया सुरू ठेवू, असं मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
सीएम केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, दिल्लीत कोरोनाची प्रकरणे सातत्याने कमी होत आहेत. गेल्या २४ तासात संसर्ग दर १.५% झाला आहे आणि कोरोनाची सुमारे ११०० रुग्णांची नोंद झाली आहे. “कोरोनाविरूद्ध लढाईत दिल्लीकरांनी केलेल्या कठोर परिश्रमांमुळे दिल्लीतील परिस्थिती वेगाने सुधारत आहे, लॉकडाऊननंतर दिल्ली हळूहळू अनलॉक करण्यास सज्ज झाल्याचे दिसत आहे. सोमवारी सकाळपासून बांधकाम क्षेत्र व कारखाने सुरू केले जाणार आहेत.
सीएम केजरीवाल पुढे म्हणाले, कोरोना कमी झाला आहे, मात्र, तो संपला नाही हे आपल्याला कायम लक्षात ठेवण्याची गरज आहे. म्हणून आम्ही दिल्ली हळूहळू उघडणार आहोत. जेणेकरून एकत्र उघडल्यामुळे संसर्ग पुन्हा वाढू नये. पुढे ते म्हणाले, की दिल्ली पुन्हा सुरू करताना आम्ही अशा लोकांची काळजी घेतली आहे, जे समाजातील लहान वर्ग आणि गरीब आहेत. ज्याचं हातावर पोट आहे.