लॉकडाऊन करुनही फारसा फायदा झाला नाही : हसन मुश्रीफ
कोल्हापूर: राज्यात लॉकडाऊन करुनही फारसा फायदा झाला नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकासआघाडी सरकारची पंचाईत होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन करुन फायदा झाला नाही. आता अनलॉकमध्ये नागरिकांना खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे मुश्रीफ यांनी म्हटले.
ते शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कोरोनाची पुढची लाट मोठी असू शकते. त्यामुळे खबरदारी घेण्याची गरज आहे. या लाटेत लहान मुलं विळख्यात सापडण्याची शक्यता आहे. दुकानं उघडली की लोकं जीवघेणी गर्दी करतात, ते टाळलं पाहिजे. नियोजन करुन वस्तू खरेदी कराव्यात, असा सल्ला हसन मुश्रीफ यांनी दिला. चाचण्या वाढवल्याशिवाय कोरोनावर नियंत्रण मिळवू शकत नाही. राज्यात कोणतीही आकडेवारी लपवली जात नाही. मृत्यूची आकडेवारी ही खरीच सांगितली जाते, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.
नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीचे मोदींशी चांगले संबंध
बँकांना कोट्यवधी रुपयांना ठकवून परदेशात फरार झालेल्या नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीवरून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी धक्कादायक विधान केलं आहे. नीरव मोदी आणि चोक्सीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चांगले संबंध आहेत. त्यामुळेच या दोघांवर कारवाई केली जात नाही, असं धक्कादायक विधान मुश्रीफ यांनी केलं आहे. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे दोघेही गुजरातचे आहेत. त्यांचे मोदींशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे दोघांवरही कारवाई केली जात नाही, असं सांगतानाच चोक्सीला अटक केल्यानंतर देखील आपली तपास यंत्रणा हात हलवत परत येणार हे मला माहीत होतं, असं धक्कादायक विधान मुश्रीफ यांनी केलं आहे.