देशात वाढला कोरोनाचा कहर; बीड जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर
मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा कहर वाढताना दिसत आहे. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत नव्या कोरोनाबाधितांची संख्या अधिक वाढत आहे. यामुळे रुग्ण रिकव्हर होण्याचे प्रमाण कमी होऊन ९५ टक्क्यांवर आले आहे. गेल्या एका दिवसात कोरोनाचे ४७ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. तर देशात आतापर्यंत ५ कोटी ८ लाखांहून अधिक लोकांची कोरोनाची लस घेतली आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक सुरुच असल्याचे दिसून येत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मराठवाडा या ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात बीड जिल्ह्यात (Beed district) लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. 26 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. बीड जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन लागू केल्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.
कोरोना रुग्ण वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. आता जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात कडक निर्बंध असणार आहेत. शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. तसेच सर्व खासगी कार्यालयेही बंद राहणार आहेत. मंगल कार्यालय बंद राहतील. स्वागत समारंभ करता येणार नाहीत. हॉटेल बंद राहणार आहेत. तसे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत शिथिलता असणार आहे. यात किराणा दुकान, ठोक विक्रेते सुरू राहणार आहेत. दूध विक्री आणि मेडिकल सुरू राहणार आहेत.
दरम्यान, जिल्हा स्तरावर निर्बंध लादण्याच्या केंद्र सरकारने राज्यांना सूचना दिल्या आहेत. तर राज्यव्यापी लॉकडाऊन लावता येणार नाही, असेही केंद्राने स्पष्ट केले आहे. गृहमंत्रालयाने मंगळवारी याबाबत नवी मार्गदर्शक तत्व जारी केली आहे. नवी नियमावलीनुसार जिल्हा, उपजिल्हा, शहर आणि प्रभाग स्तरावर निर्बंध लादले जाऊ शकतात असे सूचित केले आहे. ही नियमावली 30 एप्रिलपर्यंत लागू असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ४७ हजार २६२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २७५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर २३ हजार ९०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी १७ लाख ३४ हजार ५८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ६० हजार ४४१ जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी १२ लाख ५ हजार १६० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ३ लाख ६८ हजार ४५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५ कोटी ८ लाख ४१ हजार २८६ जणांचे लसीकरण झाले आहे.
देशात २३ मार्चपर्यंत २३ कोटी ६४ लाख ३८ हजार ८६१ जणांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यापैकी १० लाख २५ हजार ६२८ जणांच्या कोरोना चाचण्या या काल (मंगळवार) दिवसभरात झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.