आरोग्य

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर

मुंबई : लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी राजीव कानिटकर यांची नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी डॉ. कानिटकर यांची कुलगुरुपदावर नियुक्ती जाहीर केली. डॉ. कानिटकर या सध्या एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (DCDIS) (Medical) म्हणून नवी दिल्ली येथे कार्यरत आहेत.

डॉ माधुरी कानिटकर (जन्म १५ ऑक्टो १९६०) यांनी सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथून प्रथम क्रमांकाने एमबीबीएस पदवी प्राप्त केली असून त्यांनी बालरोगशास्त्र या विषयात एमडी प्राप्त केली आहे. त्यांनी २०१७ ते २०१९ या काळात सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता म्हणून काम केले असून त्यांना अध्यापन व संशोधनाचा एकूण २२ वर्षांचा अनुभव आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे २००८ साली त्यांना सर्वोत्तम शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा कार्यकाळ नियत वयोमानानुसार १० फेब्रुवारी २०२१ पूर्ण झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचेकडे पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी ओरिसा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती न्या. कल्पेश झवेरी यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती. दिल्लीच्या अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्थेचे (एम्स) महासंचालक डॉ. रणदीप गुलेरिया व राज्याच्या वैदयकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय हे समितीचे सदस्य होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button