मुक्तपीठ

‘मा.मुं.’चे ‘मा.मुं’ना पत्र !

- मुकुंद परदेशी (संपर्क - ७८७५० ७७७२८)

प्रिय मित्र उधोजीराजे,
मा.मु.
महाराष्ट्र राज्य यांसी

देवानाना नागपूरकर, मा.मु.महाराष्ट्र राज्य याचा सप्रेम नमस्कार. तुमच्या नावापुढील मा.मु.चा अर्थ (सध्यातरी) माननीय मुख्यमंत्री असून माझ्या नावापुढील मा.मु.चा अर्थ (सध्यातरी) माजी मुख्यमंत्री असा आहे. यात (अर्थासहित) कधीही बदल होऊ शकतो, म्हणूनच मुद्दाम लघुरूपे वापरली आहेत. गैरसमज नसावा.मध्यंतरी तुम्ही दिल्लीदरबारी जाऊन आलात असे कळले, पण तुमची चौकशी करण्याचे राहूनच गेले होते. नुकतेच तुमच्या एका ‘प्रतापी’ सहकाऱ्याने तुम्हाला लिहिलेलं ‘काका मला वाचवा’ छाप पत्र आमच्या चं. दा. कोल्हापूरकरांच्या हाती लागलं. त्यांनी ते रात्री दोन वाजता मला व्हाट्सएपवर पाठवलं आणि मला एकदम तुमच्या दिल्ली दौऱ्याची आठवण झाली. तुमच्याबद्दल अशी काही बातमी कळली की, आमच्या कोल्हापूरकर दादांना अगदी नवव्या महिन्यासारख्या कळा यायला लागतात बघा. जरा धीर धरवत नाही. रात्र पाहत नाहीत की पहाट पाहत नाहीत, ताबडतोब मला मेसेज नाहीतर कॉल करतात. मला मेसेज किंवा कॉल केला की त्यांना ‘ सुटका’ झाल्यासारखं वाटतं बघा. आजही रात्री दोन वाजता त्यांनी मला ‘ते’ पत्र व्हाट्सएपवर पाठवलं ! असो.

तुमचा दिल्ली दौरा चांगलाच ‘फ्रुटफुल’ झालेला दिसतो. तिथे तुमचा पाहुणचार करतांना दिलेला ‘ जलेबी ने फाफडा’ आणि त्याच्या सोबतचं स्लोगन ‘ जलेबी ने फाफडो , उधोजीराजे आपडो.’ मीच दिल्लीश्वरांना सुचवलं होतं आणि ते अपेक्षेपेक्षा जास्तच परिणामकारक ठरलेलं दिसतं. तसा तुमचा दिल्ली दौरा झाल्यावर मला दिल्लीश्वरांकडून निरोप आलाच होता की, आता तुम्ही काहीच करू नका, शांत रहा. सर्व काही आपोआपच घडेल, उधोजीराजेच सर्व घडवून आणतील म्हणून. तरी एवढया लवकर तुम्ही कामाला लागाल असे वाटले नव्हते ! बाकी तुम्ही तुमच्या ‘ प्रतापी’ सहकाऱ्याकडून फारच छान पत्र लिहून घेतलं आहे. तुम्ही जर ‘पत्रलेखन क्लासेस’ सुरू केलेत ना, तर फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सर्व देशांतून विद्यार्थी येतील असा मेसेजही आमच्या चं. दा. कोल्हापूरकरांनी पाठविला आहे. असो.

पण पत्र खरोखरच फार छान लिहिलं आहे. कॉलेजमध्ये असताना काही मित्रांनी त्यांच्या मैत्रिणींना लिहिलेली प्रेमपत्रे वाचली होती , पण आपणच, आपल्याच माणसाकडून, आपल्यालाच पत्र लिहून घ्यायचं आणि त्यातून आपल्या प्रियपात्राला ‘ संकेत मिलनाचा’ द्यायचा ही कल्पनाच अफलातून वाटली. अर्थात असले अफलातून प्रकार तुम्ही यापूर्वीही केलेले आहेतच . बुलेटट्रेन मधून उतरून ( सेकंड हॅन्ड) रिक्षात बसण्याचा तुमचा निर्णयसुद्धा असाच अफलातून होता. ‘वेष असावा बवळा ,परी अंतरी नाना कळा ।’ हे तुम्हाला तंतोतंत लागू होतं. (क्षमस्व.पूर्वार्ध वगळावा.) आतातर त्या (सेकंड हॅन्ड) रिक्षाचं एक आधीच पंचर असलेलं चाक वेगळं धावायचं म्हणतंय म्हणे ! तुमच्या त्या ( सेकंड हॅन्ड) रिक्षाचं एक चाक निखळायच्या आधीच तुम्ही ती (सेकंड हॅन्ड) रिक्षा सोडून आमच्या बुलेटट्रेनमध्ये बसण्यातच तुमचं (आणि आमचंही )हित आहे. खरे मित्र ओळखा. उगाच ‘ताजा कलम’ लिहिणाऱ्या ‘सूर्याजी पिसाळां’च्या नादी लागू नका ! ते तुमच्या झाडाची छाटणी करून त्याच्यावर दुसऱ्याच झाडाचं कलम करण्याच्या तयारीत आहेत. कलम केलेलं झाड एकदा का वाढायला लागलं की मूळ झाडाला काही किंमतच उरत नाही. २५-३० वर्ष जुना संसार मोडून घटस्फोटितांसोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहण्यात कोणता शहाणपणा आहे ? सूज्ञास अधिक काय सांगावे. पुढील पावले लवकर उचला.

अखंड सावधान असावे । दुश्चित कदापि नसावे ।
तजवीजा करीत बसावे । मातोश्री महली ।
काही उग्रस्थिती सोडावी ! काही सौम्यता धरावी !
मागील अपराध क्षमावे । कारभारी हाती धरावे ।
सुखी करुनि सोडावे । मज सारख्या मित्रासी ।
तिर्थरूपांचे आठवावे स्वरूप । तिर्थरूपांचा आठवावा साक्षेप !
तिर्थरूपांचा आठवावा ‘प्रताप’ । महाराष्ट्रराष्ट्री !

आपला परममित्र

देवानाना नागपूरकर

ता.क. – सौ. वहिनींच्या हातचे कांदेपोहे , आलूबोंडे आणि वरून फक्कड मसाला चहा पिऊन फार दिवस झालेत. लवकर बोलवा. सौ. वहिनींना नमस्कार सांगावा. बाळराजेंची अधूनमधून भेट होत असते.

– देवानाना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button