वास्तविक एखाद्या प्रतिष्ठित दैनिकासाठी स्तंभलेखन करण्याची संधी मिळणे ही आनंदाची, अभिमानाची, आपल्या प्रतिभेची एक वेगळी ओळख करून देणारी बाब ठरायला हवी, पण गुलाबासोबत काटे येणारच ! छान टपोऱ्या, लालबुंद, दूरवर आपला सुगंध पसरवून वातावरण प्रसन्न करणाऱ्या गुलाबासोबत दोन चार काटे असले तर आपण समजू शकतो, पण प्रत्येकवेळी गुलाबाचा सुगंध नाकात भरून घेतांना चार काटे जर बोटांना आणि नाकाला रक्तबंबाळ करू लागले तर हातातून तो गुलाब गळून पडणार आणि त्या जागी सोफ्रामायसिनचा मलम धरावा लागणार की नाही ? मग त्या गुलाबाच्या सुगंधाचा आनंद कसा घेता येणार ? एखाद्या दिवशी छानपैकी आमरस पुरीचा आस्वाद घेत रसना आणि उदारासोबतच मनही तृप्त करून घ्यावे आणि बायकोच्या आग्रहापोटी ( असाच आग्रह आमरस वाढताना केला असता तर ?) ग्लुकोमिटरवर शुगर मोजावी आणि ती चारशे यावी ! कुठे जाईल ती तृप्ती ? बायको क्षणात तुम्हाला ‘अतृप्त आत्मा’ ठरवून तुमची तृप्ती हिरावून घेईल. असाच काहीसा अनुभव स्तंभलेखन करतांना येतो.
आजच्या दैनिकात माझा एक लेख आलेला असतो. सकाळी जाग येते तीच मुळी एका वाचकाच्या फोनने. नंतरही सात आठ वाचकांचे लेख आवडल्याचे फोन येतात. दिवसाची सुरुवात प्रसन्न झालेली असते. पलंगावरून खाली उतरल्यावरही पाय जमिनीपासून चार अंगुळे वरच राहतात. त्या तरंगत्या अवस्थेतच मुखमार्जन करून चहा पिण्यासाठी बसतो. (बायको माझ्या चहा पिण्याला ‘ चहा ढोसणे’ म्हणते ! का तर म्हणे मला एकावेळी तीन कप चहा लागतो !) त्या प्रसन्न तरंगत्या अवस्थेत ( बायकोने मुद्दामच कमी साखर टाकल्याने फिक्का झालेला) बायकोच्या हातचा चहा बासुंदीपेक्षाही जास्त गोड वाटतो. परत एका वाचकाचा फोन येतो. आपली स्तुती बायकोच्या कानावर पडावी ( नरकात गेल्यावर म्हणे यम उकळतं तेल कानात टाकतात !) म्हणून फोन स्पीकरवर टाकला जातो. पुढे –
मी – (फोन उचलत) हॅलो , कोण बोलतंय ?
वाचक – मी चंदूदादा बोलतुया. आजच्या पेप्रात तुमचा लेक आला आहे ना ?
मी – ( उत्सुकतेने) हो. हो. काय करता आपण ?
वाचक – उगाच खोटं कशाला बोलावं शिकलेल्या मानसावानी ? भट्टी लावितो बगा.
मी – ( सहानुभूती दाखवत) ठीक आहे. पोटापाण्यासाठी काहीतरी करावंच लागतं माणसाला .
वाचक – तेच म्हणतो मी. असं रिकाम्यावानी या पेप्रात लिव , त्या पेप्रात लिव असं करून कूटं पॉट भरतं का मानसाचं ? त्यासाठी मंग बायकोला नोकरीवर धाडावं लागतं.
मी – ( बायकोची नजर चुकवत ) फोन कशासाठी केला तुम्ही ?
वाचक – तेच म्हनलं तुमच्या मॅडम कूटं नौकरी करतात की काय ?
मी – (चिडत) हे विचारण्यासाठी फोन केला होता का तुम्ही ?
वाचक – नाही हो. मी ईचारनार हुतो की, पेप्रात लेक छापून ऐन्यासाठी पेपर छापणाऱ्याशी वळक लागती का ?
मी – ( चिडून) कोणी सांगितलं तुम्हाला ?
वाचक – ( शांतपणे ) चिडू नका बगा . कोनाचेबी अन कायबी लेक छापत्यात ना हे पेपरवाले म्हनून ईचारलं.
मी – ( चिडून) पेपर त्यांचा आहे. त्यांना हवं ते छापतील ते . तुम्हाला काय करायचं आहे ?
वाचक – ( शांतपणे ) माजा बी लेक छापतील कावो हे पेप्रात ?
मी – ( उत्सुकतेने ) तुम्ही लेख लिहिता ?
वाचक – तेचं असं हाय की, दोन कार्टर पोटात गेली की मीबी लिवतो.
मी ( कुत्सितपणे) कोण वाचतं ते ?
वाचक – ( उत्साहाने) माज्या संग जे बसत्यात ना पिवायला ते वाचतात ना. ते म्हंटयात की’ त्यो इनोदी लिवनारा गिरीश फनेकर आहे ना, मी तेच्यावानी लिवतो म्हणून ! मलाबी तसंच वाटतं बगा. तुम्च्या वळकीचे अस्तील तर त्येंना दाकवा की माजे लेक. त्येबी कुश वतील बगा.
मी – (वैतागून) अहो, तुम्ही माझा लेख वाचून फोन केला ना ? मग तो आवडला का ?
वाचक – ( शांतपणे) त्यो वाच्ला कूटं अजून. झोपताना वाच्तो मी तुम्चे लेक. छान झोप लागती बगा.
मी संतापात फोन बंद करतो.
बायको – ( हाताला धरून उठवत) पडा जरा पलंगावर. बाम चोळून देते डोक्याला.