Top Newsराजकारण

नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे टाळावेत : शरद पवार

पूरग्रस्तांना १६ हजार किट्स, २५० डॉक्टरांचं पथक; राष्ट्रवादीकडून मदत जाहीर

मुंबई : राज्यात नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा मदतकार्य होणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे कोणत्याही नेत्यानं प्रसंगावधान राखलं पाहिजे. अशा प्रकारचे दौरे केल्याने यंत्रणा त्यांच्यासाठी फिरवावी लागते. ते योग्य नाही. त्यामुळे ज्यांचा या भागाशी दैनंदिन संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळावा, असं आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून पूरग्रस्त १६ हजार कुटुंबांना १६ हजार किट्सचं वाटप केलं जाणार दिली. यासोबत पूरग्रस्त भागात २५० डॉक्टरांचं पथक रवाना करणार असल्याचीही माहिती पवार यांनी यावेळी दिली.

राज्यातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आवाहन केलं. तसेच नैसर्गिक आपत्तीत त्या भागाचा दौरा केल्यावर सर्व यंत्रणा नेत्यासाठी फिरवावी लागते. त्यामुळे कामात अडथळा येतो. म्हणून आपण पूरग्रस्त भागाची पाहणी करायला गेलो नाही, असं पवारांनी सांगितलं. कोणत्याही नेत्यांनी प्रसंगावधान राखावं. मी सुद्धा आता दौऱ्यावर जात नाही. त्याचं कारण बाकीची यंत्रणा फिरवावी लागते. आपल्या भोवती यंत्रणा ठेवणं योग्य नाही. दौरे होत आहेत त्याने धीर मिळतो. पण दौऱ्यामुळं शासकीय यंत्रणेचं काम वाढतं. त्यामुळं दौरे होऊ नये असं मला वाटतं. दौऱ्याला गेल्यामुळं यंत्रणेला त्रास होतो. त्यामुळे ज्यांचा या भागाशी दैनंदिन संबंध नाही, त्यांनी या भागांचा दौरा टाळावा. ठिक आहे‌ राज्यपाल जात आहेत. त्यांचे केंद्राचे संबंध‌ चांगले आहेत‌. ते‌ जास्त मदत आणू शकतात, असाही टोला त्यांनी हाणला.

माझा पूर्वीचा अनुभव, विशेषत: लातूरच्या वेळचा अनुभव आहे. अशा घटनानंतर अनेक लोक गाड्या घेऊन त्या ठिकाणी जातात. माझं आवाहन आहे, आता शासकीय यंत्रणा पुनर्वसनाच्या कामात व्यस्त आहेत. त्यांचे लक्ष विचलित होईल, त्यामुळे असे दौरे टाळावे. मी लातूरला असताना आम्ही सगळे जण कामात होतो, पंतप्रधान येत होते. त्यावेळी मी पंतप्रधानांना सांगितलं दहा दिवस येऊ नका. तुम्ही आला तर यंत्रणा तिकडे लावावी लागेल. पंतप्रधानांनी माझी ही विनंती मान्य केली. त्यानंतर ते दहा दिवसाने लातूरला आले होते, असा अनुभवही पवारांनी सांगितला.

पूरग्रस्तांना १६ हजार किट्सचे वाटप

पूरग्रस्त भागातील कुटुंबांना औषधं, लहान मुलांसाठी बिस्कीटं, भांडी, मास्क व इतर महत्वाच्या वस्तू असं १६ हजार किट्सचं वाटप केलं जाणार आहे. यासोबत पूरग्रस्त भागांमध्ये २५० डॉक्टरांचं पथक वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी पाठविण्यात येणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. या सर्व साहित्याची किंमत अडीच कोटी इतकी असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान झालं आहे. या जिल्ह्यांना तातडीनं मदत मिळणं गरजेचं आहे. काल राज्य सरकारनं काही मदत जाहीर केली आहे. ते त्यांच्या कार्यक्रमानुसार नक्कीच मदत करतील, असं पवार म्हणाले.

महाराष्ट्रातील नेता देशाचे नेतृत्व करत असेल तर आम्हाला आनंदच

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. राऊतांच्या विधानाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारण्यात आलं असता त्यांनीही महाराष्ट्रातील नेता देशाचं नेतृत्व करत असेलतर आम्हाला याचा आनंदच आहे, असं मत व्यक्त केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. पण राज्यावरील संकट पाहता मुख्यमंत्र्यानी वाढदिवस साजरा करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंमध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचं वक्तव्य केलं. उद्धव ठाकरे देशाला उत्तम नेतृत्व देतील, असं ते म्हणाले होते.

केंद्राने राज्याला मदत करावी

राज्यावरील आपत्ती मोठी आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्याला मदत करावी अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपत्तीग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर जात आहेत. त्यांचे केंद्राचे संबंध चांगले आहेत‌, ते जास्त मदत आणू शकतात, असंही पवार यावेळी म्हणाले.

तळीये गावाचं पुनर्वसन करावं लागेल

दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात माळीण गावात अशीच परिस्थिती झाली होती. त्यावेळी सरकार आणि जनतेच्या मदतीने गाव पुन्हा उभं केलं. पुनर्वसन कसं करतात त्याचं उदाहरण आहे. त्या अनुषंगाने डोंगर कडा कोसळून उद्ध्वस्त झालेल्या तळीये गावाचंही पुनर्वसन केलं जाईल, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.

आढाव्यानंतर दोन दिवसांत मदत जाहीर होणार

राज्याला पुराचा मोठा फटका बसला. या पुरामुळे घरांचं, शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे. राज्यात सात आठ जिल्यात पूरस्थिती आहे. कोकणात घरांचं नुकसान झालंय. इतर ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय. माती वाहून गेलंय. सहा जिल्ह्यांमध्ये अधिक नुकसान झालं आहे. राज्य सरकार त्यांच्या कार्यक्रमानुसार मदत करेल. काही तातडीची मदत राज्य सरकारकडून मिळणार आहे. आढाव्यानंतर राज्य सरकार आणखी मदत जाहीर करेल अशी खात्री आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button