नाशिक : गुरु गोबिंद सिंग फाउंडेशनचा स्थापना दिवस दरवर्षी प्रकाशपर्व म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. परंतु कोरोना महामारीच्या काळात कोणत्याही प्रकारच्या नियमांचे उल्लंघन न करता गुरु गोबिंद सिंग यांची जयंती अर्थात प्रकाशपर्व वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. यंदाच्या प्रकाशपर्वाला गुरु गोबिंद सिंग फाउंडेशनच्यावतीने अत्याधुनिक सोईंनी सज्ज मोबाइल मेडिकल व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले.
जिथे दळणवळणाचे साधन नाही, जिथे आरोग्य सुविधा पुरेशा नाहीत अशा ग्रामीण भागासाठी गुरु गोबिंद सिंग फाउंडेशनच्या मोबाइल मेडिकल व्हॅनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल असे प्रतिपादन फाउंडेशनचे अध्यक्ष बलबीर सिंग छाब्रा यांनी केले. गोरगरीब रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहोचता यावे, त्यांना प्रथमोपचार त्वरित मिळावेत हा मुख्य उद्देश या मोबाइल मेडिकल व्हॅनचा आहे. यात प्रथमोपचार सुविधा आहेत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी फाऊंडेशनच वरिष्ठ उपाध्यक्ष हरजीत सिंग आनंद, सचिव कुलजित सिंग बिर्दी, व्यवस्थापन मंडळाचे इतर सन्माननीय सदस्य आणि कार्यकारी संचालक डॉ. परमिंदर सिंग यांनी सूचित केले की मोबाईल मेडिकल व्हॅन सुविधा ही नाशिक शहर आणि ग्रामीण भागात देखील उपलब्ध होईल. यावेळी तिन्ही शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य व कर्मचारी उपस्थित होते.