लालूंचा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर; भाऊबंदकी उफाळली
पटना : बिहारमध्ये मोठा विरोधी पक्ष ठरलेल्या राष्ट्रीय जनता दलमध्ये सारेकाही आलबेल नाहीय. लालूप्रसाद यादव यांच्या दोन्ही मुलांमध्ये पोस्टरवरून एकमेकांचे फोटो काढून टाकणे सुरु झाले आहे. सुरुवात तेजप्रतापने केली असून त्यावर आता तेजस्वी यादव याने मुख्यालयातूनच तेजप्रतापचे पोस्टर खाली उतरवले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाटन्याच्या पक्ष कार्यालयात जे काही घडत आहे, ते दोघांमध्ये वर्चस्ववाद सुरु असल्याचेच संकेत देत आहे. नुकताच राजदच्या कार्यालयात विद्यार्थी संघटनेचा एक कार्यक्रम झाला. यामध्ये तेजप्रताप प्रमुख पाहुणा होता. यासाठी तेजप्रतापचे मोठेमोठे पोस्टर दिसले, मात्र, तेजस्वी यादवचा चेहरा गायब होता. जेव्हा हा वाद वाढला तेव्हा त्या पोस्टरवरील तेजप्रताप यादव याच्या चेहऱ्याला काहींनी काळे फासले. आता रातोरात हे पोस्टरदेखील उतरवण्यात आले आहेत. आता या जागी नवीन पोस्टर लागले आहेत, यामध्ये लालू यादव, राबडी देवी यांच्यासह तेजस्वी यादवचे फोटो आहे. मात्र, तेजप्रताप गायब झाला आहे.
अशावेळी मुख्य प्रश्न हा उभा आहे की, तेजप्रताप यादवने तेजस्वी यादवचा फोटो का घेतला नव्हता आणि आता नवीन पोस्टरमध्ये तेजस्वीचा फोटो आहे, पण तेजप्रतापचा का नाहीय. यावरून लालूंच्या पक्षात सत्तासंघर्षाला सुरुवात झाल्याचे हे संकेत आहेत. दुसरीकडे राजदचे प्रवक्ते शक्तीस सिंह यादव यांनी सांगितले की, दोन्ही भावांमध्ये काहीही असे सुरु नाही. रविवारी जे झाले ती एक मानवी चूक होती. तेजप्रताप यादव यांनी आधीच तेजस्वी भविष्यातील मुख्यमंत्री असेल असे स्प्ष्ट केलेले आहे.