मुंबई: आयपीएलच्या मंगळवारी दुपारी सामन्यात केकेआरने दिल्लीवर ३ गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे केकेआरच्या पुढील फेरीत जाण्याच्या आशा जिवंत राहिल्या असून दिल्लीची सलग विजयांची मालिका खंडीत झाली आहे. या सामन्यात दिल्लीने दिलेल्या अवघ्या १२८ धावांचा पाठलाग करतानाही केकेआरची दमछाक झाली. पण सामन्यात केकेआरचा एक खेळाडू मात्र पुन्हा चमकला. यंदाच्या हंगामातील केकेआर संघाचा खास खेळाडू व्यंकटेश अय्यर असं या खेळाडूचं नाव असून त्याने आजच्या सामन्यात १४ धावाच केल्या असल्या तरी ४ ओवरमध्ये केवळ २९ धावा देत २ विकेट्स घेतल्या. या त्याच्या आय़पीएलमधील पहिल्याच विकेट असल्याने तो अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत समाविष्ट झाला असून त्याने एक खास कामगिरीही केली आहे.
दिल्ली आणि केकेआर यांच्यातील सामन्यात केकेआरने दिल्लीवर तीन गडी राखून विजय मिळवला. अवघ्या १२८ धावांचा पाठलाग करतानाही केकेआर संघाची अवस्था दिल्लीच्या गोलंदाजानी खराब केली. त्यामुळे सामना १९ व्या षटकापर्यंत तर गेलाच सोबतच केकेआर केवळ ३ विकेट्सच्या फरकाने जिंकली. सामन्यात शुभमन (३०) आणि सुनीलच्या (२१) खेळीसह नितीशची नाबाद ३६ धावांची खेळी महत्त्वपूर्ण ठरली. दरम्यान गोलंदाजीवेळी अय्यरने हीटमायर आणि अक्षर पटेल या महत्त्वाच्या दिल्लीच्या खेळाडूंची विकेट संघासाठी महत्त्वाची ठरली.
दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी अय्यरने ३ सामने खेळत ५६ च्या सरासरीने ११२ रन केल्या आहेत. यावेळी १५६ इतका त्याचा स्ट्राइक रेट होता. यात एक अर्धशतकंही असून त्याने १४ चौकार आणि ४ षटकार लगावले आहेत. अय्यरच्या टी20 कारकिर्दीचा विचार करता ४१ सामन्यात त्याने २६ च्या सरासरीने २१ विकेट घेतल्या आहेत.