Top Newsसाहित्य-कला

राज्यातील कीर्तनकारांना ‘अच्छे दिन’, महिन्याला मिळणार ५ हजार रु. !

पंढरपूर : उद्धव ठाकरे सरकारने राज्यातील कीर्तनकारांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. राज्यातील वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, यांना ५ हजार रुपये मानधन देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असल्याची माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली आहे.

कोरोनाकाळात कीर्तने, प्रवचने बंद असल्याने छोट्या मोठ्या कीर्तनकार, प्रवचनकार यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली तर काही जणांना उपासमारीला देखील सामोरं जावं लागलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम बंद आहेत. त्यात कीर्तनकार-प्रवचनकार दुसरं कोणतं कामंही करु शकत नाही. त्यामुळे त्यांना शासनाकडून मदतीची गरज होती. अखेर ठाकरे सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्यातील कीर्तनकारांना कोरोना काळात ‘अच्छे दिन’ दाखवले आहेत.

वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक यांना प्रत्येकी ५ हजार रुपये मानधन म्हणून मिळणार आहे. यासंदर्भात काल सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख आणि महसूल मंत्री बाळासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये वारकरी साहित्य परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत हा स्त्युत्य निर्णय घेण्यात आला.

सरकारने घेतलेला निर्णय अतिशय चांगला आणि योग्य आहे. आम्हाला सरकारच्या निर्णयाने मोठा दिलासा मिळालेला आहे.राज्यभरात असे अनेक कीर्तनकार, प्रवचनकार, गायक-वादक आहेत, ज्यांची कोरोनाकाळात आर्थिक परिस्थिती डबघाईला आली होती. पण सरकारच्या निर्णयाने त्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळालेला आहे, अशी प्रतिक्रिया वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button