नांदेड : मंत्रालयात जाऊन नगरविकास खात्याच्या फाईली पाहणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली आहे. मलिक यांनी सोमय्यांची थेट बॉलिवूड सिनेमातील आयटम गर्लशीच तुलना केली आहे. किरीट सोमय्या राजकीय क्षेत्रात भाजपच्या आयटम गर्ल सारखं काम करत आहेत. बातमी कशी होईल यासाठी आयटम गर्लचा कार्यक्रम सुरू आहे, अशी खोचक आणि वादग्रस्त टीका राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे. मलिक यांच्या या वादग्रस्त टीकेचे राजकीय पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. तर, मलिक यांनी ही टीका केल्याने आता त्यावर किरीट सोमय्या काय प्रतिक्रिया देतात याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागलं आहे.
बॉलिवूडमध्ये एखादा सिनेमा चालवण्यासाठी आयटम गर्लची गरज लागते. मला वाटतं किरीट सोमय्या राजकीय क्षेत्रात भाजपच्या आयटम गर्ल सारखं काम करत आहेत. बातमी कशी होईल यासाठी आयटम गर्लचा कार्यक्रम सुरू आहे, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.
यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरही भाष्य केलं. येत्या २८ तारखेला सर्वोच्च न्यायालयात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबतची तारीख आहे. तसेच ओबीसी आरक्षणाविषयी सरकार अनुकूल असून या विषयी महाविकास आघाडीच्या तिन्ही मंत्र्यांनी बसून अंतरिम अहवाल कसा सादर करायचा यावर चर्चा झाली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
देशात परिवर्तन निश्चित होणार आहे. पाच राज्यात भाजपच्या विरोधात वातावरण आहे. २०२४ च्या आधी या देशात एक पर्याय निर्माण करण्याच काम सर्वलोक करतील. आम्ही काँग्रेसला घेऊन देशात पर्याय निर्माण करण्याच्या दिशेने काम करू, असंही त्यांनी सांगितलं.