मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपानंतर एनसीबीचे फरार असलेले साक्षीदार किरण गोसावी आता उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये शरण येणार असल्याची माहिती समोर येत आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त प्रसारित केले आहे. किरण गोसावी यांनी पुणे पोलिसांकडे शरण येण्यास नकार दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपानंतर किरण गोसावी फरार झाले होते. पोलिसांकडून त्यांचा तपास सुरू होता. दरम्यान रविवारी किरण गोसावी यांचे बॉडिगार्ड प्रभाकर साईल यांनी केलेल्या खुलाशानंतर एकच खळबळ उडाली. मात्र आता किरण गोसावी यांनी स्वत: ते शरण येणार असल्याचे सांगितले आहे.
किरण गोसावी यांचे बॉडी गार्ड प्रभाकर साईल यांनी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात २५ करोड रुपयांचे डिल करण्यात आले होते त्यातील ८ करोड रुपये समीर वानखेडे यांना देण्यात येणार असल्याचा खुसाला केला. मात्र प्रभाकर साईल यांनी केलेले सर्व आरोप किरण गोसावी यांनी फेटाळले आहेत. याविषयी किरण गोसावी यांनी बोलताना, मी याबाबत अनेक वेळा बोललो असून मी उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये सरेंडर करत असल्याचे सांगितले.
रविवारी किरण गोसावी यांचा बॉडिगार्ड प्रभाकर साईल यांनी केलेल्या खुलाशामध्ये किरण गोसावी यांच्या सांगण्यावरुन साईल यांनी ५० लाख रुपये सॅम डिसोझा यांना दिल्याचा दावा केला. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेण्यात आले त्यावेळी आर्यन खानसोबत किरण गोसावी यांनी काढलेला सेल्फी प्रचंड व्हायरल झाला होता. मात्र किरण गोसावी यांच्या एनसीबीशी कोणताही संबंध नसल्याचे एनसीबीकडून स्पष्ट करण्यात आले होते.
किरण गोसावी यांच्या विरोधात मुंबई तसेच पुण्यात फसवणुकीच्या अनेक तक्रारी दाखल आहेत. त्याचप्रमाणे किरण गोसावी हे वॉन्टेड असल्याचे पुणे पोलीस आयुक्तांकडून सांगण्यात आले होते. यासंबंधीचे पुरावे मंत्री नवाब मलिक यांच्याकडून सादर करण्यात आले आणि त्यानंतर किरण गोसावी फरार झाले होते.