पोलार्डची वादळी खेळी; मुंबईचा चेन्नईवर थरारक विजय
नवी दिल्ली : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जवर चार गाडी राखून थरारक विजय मिळवला. अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना कारयन पोलार्डने विजयाचे लक्ष्य मिळवून दिले. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये पोलार्डने ही धमाकेदार कामगिरी केली. चेन्नईने विजयासाठी दिलेले २१९ धावांचे तगडे आव्हान मुंबईने शेवटच्या चेंडूवर पूर्ण केले. कायरन पोलार्ड हा मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. पोलार्डनेही विक्रम रचला. तसेच मुंबईने या विजयासह ऐतिहासिक कामगिरी केली.
पोलार्डने चेन्नई विरुद्धच्या या सामन्यात ३४ चेंडूत ६ चौकार आणि ८ षट्कारांसह २५५.८८ च्या स्ट्राईक रेटने नाबाद ८७ धावा चोपल्या. या दरम्यान पोलार्डने १७ चेंडूत अर्धशतक लगावलं. यासह पोलार्ड या १४ व्या मोसमात दिल्लीच्या पृथ्वी शॉला मागे टाकत कमी चेंडूत अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला. पृथ्वीने १८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं. पोलार्डने आपल्या खेळीत एकूण ८ षटकार लगावले. त्यापैकी ३ षटकार हे ९० मीटरपेक्षा अधिक लांबीचे लगावले. पोलार्डने ९३, ९७ आणि १०५ मीटर लांबीचे गगनचुंबी षटकार लगावले.
पोलार्डने बॅटिंगसह बोलिंगमध्येही कमाल केली. पोलार्डने मुंबईकडून या सामन्यात सर्वाधिक गडी बाद केले. त्याने २ षटकात १२ धावा देत २ गडी मिळविले. विशेष म्हणजे पोलार्डने लागोपाठच्या २ चेंडूंवर २ गडी बाद केले. पोलार्डने फॅफ डु प्लेसीस आणि सुरेश रैना या घातक फलंदाजांना बाद केलं. पोलार्डने या सामन्यात बोलिंगसह बॅटिंगने शानदार अष्टपैलू कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीसाठी पोलार्डला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासह पोलार्ड चेन्नई विरुद्ध मुंबईकडून सर्वाधिक ४ वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार घेणारा खेळाडू ठरला.
धावांचा यशस्वी पाठलाग
आयपीएलच्या इतिहासात मुंबईने पहिल्यांदा २०० पेक्षा अधिक धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला आहे. याआधी मुंबईने पंजाब विरुद्ध २०१९ मध्ये १९८ आणि २०१७ मध्ये १९९ धावा यशस्वीरित्या पार केल्या होत्या. तसेच २०१४ मध्ये राजस्थानने दिलेले १९५ धावांचे आव्हान मुंबईने यशस्वीरित्या पूर्ण केलं होतं.
विजयासाठी २१९ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सला रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी शानदार सुरूवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७१ धावांची भागिदारी केली. ही जोडी शार्दुल ठाकूरने फोडली. त्याने रोहित शर्माला ३५ धावांवर बाद केले. त्यानंतर मुंबईचा डाव गडगडला. रोहितच्या जागी आलेल्या सूर्यकुमार यादवला जडेजाने ३ धावांवर बाद केले. त्यानंतर मोइन अलीने डी कॉकला ३८ धावांवर माघारी पाठवले. त्यामुळे मुंबईची अवस्था शून्य बाद ७१ वरून ३ बाद ८१ अशी झाली होती. धावांचा पाठलाग करताना मुंबई मागे पडत असताना कायरन पोलार्डने धमाकेदार फलंदाजी केली. अखेरच्या षटकात मुंबईला विजयासाठी १६ धावांची गरज होती. पोलार्डने विजयाचे लक्ष्य अखेरच्या चेंडूवर पार करून दिले. चेन्नईकडून सॅम करनने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या.
तत्पूर्वी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच ओव्हरमध्ये ट्रेंट बोल्टने सलामीवीर ऋतुराज गायकवाडला बाद करत चेन्नईला पहिला धक्का दिला. पण त्यानंतर आलेल्या मोइन अली याने फाफ डु प्लेसिससह मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १०८ धावांची भागिदारी केली. मोइन अलीला बुमराहने बाद केले. त्याने ३६ चेंडूत ५ षटकार आणि ५ चौकारांसह ५८ धावा केल्या. त्यानंतर फाफने अर्धशतक केले आणि तो पोलार्डच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने २८ चेंडूत ५० धावा केल्या. १२व्या षटकात पोलार्डने पाचव्या चेंडूवर त्याला बाद केला. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर सुरेश रैनाला २ धावांवर बाद करून चेन्नईची अवस्था १ बाद १११ वरून ४ बाद ११६ अशी केली.
झटपट दोन विकेट पडल्याने चेन्नईची धावसंख्या धीमी झाली. पण त्यानंतर अंबाती रायडू आणि रविंद्र जडेजाने चौकार, षटकारांचा पाऊस पाडला. रायडूने २० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने २७ चेंडूत ७ षटकार आणि ५ चौकारांसह नाबाद ७२ धावा केल्या. तर जडेजाने नाबाद २२ धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून पोलार्डने सर्वाधिक २ विकेट तर बुमराह आणि बोल्टने प्रत्येकी एक विकेट घेतली. बुमराहने ४ षटकात ५६, धवलने ४८ तर बोल्टने ४२ धावा दिल्या.