राजकारण

केरळच्या नव्या मंत्रिमंडळामुळे ‘डाव्यां’मध्ये घराणेशाहीचा वाद

तिरुअनंतपुरम: केरळमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत लेफ्ट डेमोक्रॅटिक अलायन्सने (LDF) ऐतिहासिक विजय प्राप्त केला. त्यामुळे आता पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा सरकार स्थापन होत आहे. पिनराई विजयन यांची मंगळवारी विधिमंडळ गटाचा नेता म्हणून निवड करण्यात आली.

केरळमध्ये सध्या नव्या वादाला तोंड फुटले आहे. कारण, शैलजा यांनी २०१८ मध्ये आलेला निपाह व्हायरस आणि कोरोनाच्या काळात आरोग्यमंत्री म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यामुळे कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी देशभरात केरळची प्रचंड चर्चा सुरु होती. या मॉडेलचा मुख्य चेहरा म्हणून शैलजा यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, आता त्यांनाच मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याने अनेकांनी टीकेचा सूर आळवला आहे. शैलजा यांचा मंत्रिमंडळात समावेश न करण्यामागे त्यांची वाढती लोकप्रियता हे मुख्य कारण असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. 1987 साली केरळातील नेत्या आर. गौरी यांचीही लोकप्रियता शिखरावर होती. त्यावेळी LDF ने आर. गौरी यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे केले होते. मात्र, निवडणुकीनंतर त्यांना पुन्हा बाजूला सारण्यात आले होते.

या सगळ्या घडामोडींमुळे डाव्या विचारसरणीच्या पक्षालाही घराणेशाहीची बाधा झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. कारण नव्या मंत्रिमंडळात पिनराई विजयन यांचे जावई आणि डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहम्मद रियास यांचा समावेश केला जाणार आहे. मोहम्मद रियाझ आणि पिनराई विजय यांच्या मुलीचे गेल्यावर्षी लग्न झाले होते.

याशिवाय, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (CPM) कार्यकारिणीत कार्यकारी सचिव ए विजयराघवन आणि त्यांची पत्नी आर. बिंदू या दोघांनाही स्थान देण्यात आले होते. CPM ने मंत्रिपदासाठी दोन नावांची घोषणा केली आहे. यामध्ये आर. बिंदू आणि वीणा जॉर्ज यांचा समावेश आहे. मोहम्मद रियाझ आणि आर. बिंदू हे दोघेही पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. आम्हाला नव्या पिढीला संधी द्यायची असल्याने हा निर्णय घेतल्याचे पक्षाकडून सांगितले. आता येत्या २० तारखेला पिनराई विजयन यांच्यासह मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button