करुणा शर्मा यांना जामीन नाकारला; न्यायालयीन कोठडीतील मुक्काम १८ सप्टेंबरपर्यंत वाढला
बीड : अंबाजोगाई सत्र न्यायालयातील करुणा शर्मा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर पडली आहे. जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. मात्र, करुणा शर्मा यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर मंगळवारी अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांकडून लेखी बाजू मांडली नाही. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी १८ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता करुणा शर्मा यांना आणखी काही काळ न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे.
करुणा शर्मा बीडमध्ये असताना त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आले होते. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. ६ सप्टेंबरला पोलिसांनी करुण शर्मा यांना न्यायालयात हजर केले होते. तेव्हा न्यायालयाने करुणा शर्मा यांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. तसेच त्यांच्या ड्रायव्हरला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे न्यायालय आज करुणा शर्मा यांना जामीन देणार किंवा नाही, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर न्यायालयाने त्यांना जामीन नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे.