बंगळुरू : बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांविरोधात कारवाई न करता कानडी पोलिसांकडून मराठी भाषिकांवरच दांडगाई सुरू आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठी भाषिकांच्या घरात मध्यरात्री घुसून कानडी पोलिसांनी २७ जणांना अटक केली असून ६१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बंगळुरू येथे शुक्रवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची आणि भगव्या झेंड्याची विटंबना करण्यात आली. या घटनेचे तीव्र पडसाद कर्नाटकमधील मराठी भाषिकांबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. शनिवारी बेळगाव शहरातील शिवप्रेमी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने य़ा घटनेचा निषेध करण्याबरोबरच संबंधित समाजकंटकांविरोधात ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी या आंदोलनात मोठया प्रमाणावर मराठी भाषिक महिलाही सामील झाल्या होत्या. मात्र कानडी पोलिसांनी कोणाचीही तमा न बाळगता या आंदोलकांवर लाठीमार केला. कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांनीही शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. यामुळे हे प्रकरण अधिक चिघळले असून महाराष्ट्रात त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.
त्यातच पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री मराठी भाषिकांच्या घरात घुसून २७ जणांना अटक केली. त्यांना जामिन मिळू नये यासाठी वेगळी कलम त्यांच्यावर लावण्यात आली आहेत. तर ६१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आली आहेत. यामुळे महाराष्ट्र सरकारने याविरोधात आवाज उठवावा अशी मागणी सीमावर्ती मराठी भाषिकांनी केली आहे.